Jitendra Awhad Dughter : आव्हाड-पडळकर संघर्षात आव्हाडांची लेक टार्गेट ; सोशल मीडियावर संताप
राज्याचे राजकारण ढवळून टाकणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपिचंद पडळकर यांच्यातील संघर्ष आता वैयक्तिक पातळीवर गेला आहे. विधान भवन परिसरात झालेल्या वादानंतर दोन्ही नेत्यांच्या समर्थकांत जोरदार गोंधळ उडाला. या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा यांना लक्ष्य केल्याची घटना समोर आली आहे.
एका ट्विटर खात्यावरून नताशा यांच्याविरोधात अश्लील आणि अवमानकारक शब्दांत टीका करण्यात आली. यामुळे नताशा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली असून, संबंधित ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलिसांना थेट जाब विचारला आहे.
"मी या वादात कुठेही सहभागी नाही, तरीही मला आणि माझ्या कुटुंबाला यात ओढले जात आहे. या सगळ्यावर सरकार आणि यंत्रणा गप्प का?" असा संतप्त सवाल नताशा यांनी उपस्थित केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, "ही केवळ माझी नाही तर संपूर्ण समाजाच्या प्रतिष्ठेची बाब आहे," असे सांगून या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे.