Devendra Fadnavis : महाराष्ट्र थांबणार नाही! प्रजासत्ताक दिनी फडणवीसांचा ठाम निर्धार, शिंदेंकडून विकासाच्या नव्या घोषणा
भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विकासदिशेत आत्मविश्वासाचा सूर उमटला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला देशाच्या आर्थिक प्रगतीचा कणा बनवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसामान्यांच्या हिताच्या योजना आणि पायाभूत विकासावर भर देत राज्याच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प मांडला.
ध्वजारोहणानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान, लोकशाही आणि आर्थिक विकास या त्रिसूत्रीवर आधारित महाराष्ट्राच्या वाटचालीचा सविस्तर आराखडा जनतेसमोर ठेवला. “महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नाही, तर भारताच्या विकासाचे इंजिन आहे. येणाऱ्या काळात हेच इंजिन देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संविधानावर आधारित प्रगतीचा मार्ग
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारलेल्या भारतीय संविधानाने आपल्याला लोकशाहीप्रधान प्रजासत्ताक दिले. या संविधानाने दिलेल्या अधिकार, मूल्ये आणि व्यवस्था यांच्याच बळावर महाराष्ट्र सातत्याने प्रगती करत आहे. जगभरातील भारतीयांना आणि राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना त्यांनी लोकशाही दीर्घायुषी होण्याची प्रार्थना केली.
महाराष्ट्र विकासाचे इंजिन
महाराष्ट्र ही संतांची, वीरांची आणि विचारांची भूमी असल्याचे सांगत फडणवीसांनी राज्याच्या आर्थिक ताकदीवर भर दिला. दावोस येथे झालेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रासाठी तब्बल ३० लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्याचे त्यांनी नमूद केले. या गुंतवणुकीमुळे राज्यातील प्रत्येक भागात विकासाचा प्रवाह पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई राज्याचा एकही भाग विकासापासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. “महाराष्ट्र थांबणार नाही, तो सतत पुढेच जात राहील,” हा संदेश त्यांनी दिला.
शेतकरी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक समावेश
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार संवेदनशील असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, संकटाच्या प्रत्येक काळात शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला गेला. नदीजोड प्रकल्पांमुळे पाणीटंचाई दूर होण्यास मदत झाली असून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने राज्य वाटचाल करत आहे.
समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, तसेच आदिवासी व अनुसूचित घटकांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. “समाजातील प्रत्येक घटकाचा विकास हाच सरकारचा केंद्रबिंदू आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘सामान्यांच्या राज्याचा’ संदेश, एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे बोलताना आपल्या नेहमीच्या साध्या, पण ठाम शैलीत सरकारच्या जनहितकारी धोरणांचा आढावा घेतला. “आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी सुरू राहील, अशी ग्वाही देत त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर असल्याचे अधोरेखित केले. झोपडपट्टीमुक्त शहरे, मेट्रोचे विस्तारित जाळे आणि आधुनिक पायाभूत सुविधा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्याला मिळणार जागतिक ओळख
ठाण्यात २६० मीटर उंचीचा अत्याधुनिक ‘व्ह्यूइंग टॉवर’ उभारण्यात येणार असून, तो शहराची नवी जागतिक ओळख ठरेल, अशी घोषणा शिंदे यांनी केली. हा टॉवर केवळ पर्यटनच नव्हे, तर ठाण्याच्या विकासाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आत्मविश्वासाने पुढे जाणारा महाराष्ट्र
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणातून एकच संदेश स्पष्ट झाला, महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत थांबणारा नाही. संविधानाच्या मूल्यांवर, लोकशाहीच्या बळावर आणि जनतेच्या सहभागातून महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा मजबूत कणा बनण्याच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे.

