Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट, मंत्रीपद धोक्यात?
( Sports Minister Manikrao Kokate : ) राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध एक मोठा वाद उभा राहिला आहे. ३० वर्षांपूर्वी घडलेल्या एका गृहनिर्माण घोटाळ्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने या प्रकरणात तात्काळ शिक्षा लागू करण्याचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. यामुळे त्यांच्या मंत्रीपदावर देखील गडबड निर्माण होऊ शकते.
नेमकं काय घडले?
१९९५ साली नाशिकमधील कॅनडा कॉर्नर येथील प्राईम अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातील (१० टक्के राखीव) फ्लॅट मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांनी बनावट कागदपत्रांचा वापर केला होता. याबाबत प्रशासनाला गुमराह करुन त्यांनी एकाच व्यक्तीच्या नावावर चार फ्लॅट मिळवले होते. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार दाखल केली होती आणि १९९७ मध्ये सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.
न्यायालयाचा निर्णय
यापूर्वी, अतिरिक्त मुख्य न्यायाधीशांनी माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती, तसेच १० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. त्यानंतर, कोकाटे यांनी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले होते, पण न्यायमूर्ती पी. एम. बदर यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची याचिका फेटाळून जुना निकाल कायम ठेवला.
न्यायालयाचे कडक शब्द
आजच्या सुनावणीमध्ये माणिकराव कोकाटे यांचे वकिलांनी दावा केला की ते रुग्णालयात आहेत, म्हणून त्यांना काही सवलत दिली जावी. पण न्यायालयाने त्यांच्या वकिलांच्या दाव्याला नाकारून कायद्याच्या दृष्टीने सर्वांवर समान राहण्याचे ठणकावले. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना अटक वॉरंट जारी केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता सर्वांचे लक्ष आहे की, त्यांना मंत्रीपदावरून राजीनामा द्यावा लागणार का, किंवा कायदेशीर मार्गाने त्यांना तात्पुरता दिलासा मिळवता येईल का?
राज्याच्या राजकारणावर परिणाम
या निकालामुळे माणिकराव कोकाटे यांच्याच अडचणी वाढलेल्या नाहीत, तर याचे पडसाद राज्याच्या राजकारणात देखील उमठू लागले आहेत. अजित पवार गटासाठी हे एक मोठे संकट ठरू शकते. न्यायालयाने तात्काळ शिक्षेची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागेल का, हा प्रश्न राज्यभर चर्चा का विषय बनला आहे.
थोडक्यात
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध एक मोठा वाद उभा राहिला आहे.
३० वर्षांपूर्वी घडलेल्या एका गृहनिर्माण घोटाळ्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी वॉरंट जारी केले आहे.
न्यायालयाने या प्रकरणात तात्काळ शिक्षा लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
ज्यामुळे माणिकराव कोकाटे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते.

