Rapido Bike : रॅपिडो बाईकला खुद्द परिवहन मंत्र्यांनी पकडले; परिवहन विभागाकडून मंत्र्यांना खोटी माहिती
मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या चालणाऱ्या रॅपिडो कंपनीच्या बाईकस्वारावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट कारवाई करत त्याला जबरदस्त दणका दिला. मात्र असे असले तरी त्यांनी त्या बाइकस्वाराला त्याच्या भाड्याचे पूर्ण पैसे दिले. या घटनेमुळे आता अवैध पद्धतीने बाईक चालवणाऱ्या बाइकर्स संस्थांचे धाबे दणाणले आहेत.
राज्य शासनाने नुकतेच ई-धोरण जाहीर करत ठराविक अटीशर्तींचे पालन करणाऱ्या आणि केवळ इलेक्ट्रिक बाईक असलेल्या संस्थांनाच बाईक टॅक्सीची परवानगी दिली आहे. मात्र असे असले तरी राज्य शासनाच्या परवानगीशिवाय बाईक टॅक्सी सेवा सर्रासपणे नियम मोडत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने कोणत्याही बाईक अॅपला अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. याबाबत परिवहन विभागात चौकशी केली असता मुंबई आणि उपनगरांमध्ये अशी सेवा अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वतः मंत्रालयातील शहीद बाबू गेनू चौकामधून खोट्या नावाने रॅपिडो बाईक बुक केली आणि नवल म्हणजे पुढच्या दहाच मिनिटांमध्ये संबंधित रॅपिडो बाईकस्वार हजर झाला. त्या रॅपिडो बाईकस्वाराची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चांगलीच हजेरी घेतली. त्याचबरोबर परिवहन विभागाने जी खोटी माहिती दिली होती, त्याचेही पितळ उघडे पाडले.
त्या बाइकस्वाराला जरी रंगेहात पकडले असले तरी त्याला त्याच्या भाड्याचे पूर्ण पैसे प्रताप सरनाईक यांनी देऊ केले. "तुझ्यासारख्या गोरगरिबावर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. तथापि, या मागे लपलेल्या बड्या लोकांना शासन झाले पाहिजे! हाच आमचा हेतू आहे." असे सरनाईक यांनी सांगितले. या संदर्भात राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी रॅपिडोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आता याबाबत ज्या लोकांनी खुद्द मंत्र्यांनाच खोटी माहिती दिली. त्या अधिकाऱ्यांवर आता कारवाई होणार की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.