राज्यात अनेक भागात मध्यरात्रीपासूनच बत्तीगुल; वीज कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची नोटीस, कारवाईचा इशारा
महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आजापासून संपावर आहेत. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. मध्यरात्रीपासूनच वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक ग्राहक त्रस्त झाले आहेत.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तीन दिवस हा संप सुरू राहणार असल्याचं म्हटलं आहे.
महावितरणचे खासगीकरण होऊ नये म्हणून राज्यातील वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात मध्यरात्री 3 वाजल्यापासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे.महानिर्मिती या कंपन्यांचे अधिकारी आणि कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर जाणार आहेत. याच संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकराने या सर्व संघटनांना नोटीस दिली आहे. यात त्यांनी मेस्मा लावणार असल्याचं सांगितलं आहे. नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज आहे. काही तक्रारी किंवा शंका असल्यास महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असे महावितरणाने सांगितले आहे.
अदानी समूहाला वीज वितरण परवाना देण्याच्या सुरू असलेल्या हालचालींबत बाबत महावितरण कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. या संपात रत्नागिरी जिल्ह्यातील 30 संघटनांनी सहभाग घेतला आहे. हा संप असाच चालू राहिला तर याचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.