Maharashtra Local Body Election Result : राज्यात महायुतीने 210 चा आकडा ओलांडला
महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. आतापर्यंतच्या निकालांनुसार राज्यात महायुतीने 210 चा आकडा ओलांडला असून नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याचे चित्र आहे.
जळगाव जिल्हा
जळगावमधील शेंदुर्णी नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. नगराध्यक्ष पदासह 18 जागांसाठी निवडणूक झाली होती. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गोविंदा अग्रवाल विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या उज्वला काशीद यांचा 650 मतांनी पराभव केला. नगरसेवक पदासाठी भाजपचे 11, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत.
नशिराबाद नगरपंचायतीत भाजपचे योगेश नारायण पाटील 991 मतांनी विजयी झाले असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गणेश चव्हाण यांचा पराभव झाला आहे.
वाशिम जिल्हा
मंगरुळपीर नगरपरिषदेत भाजपचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांच्या पत्नी लता चितलांगे नगरसेवक पदावर विजयी झाल्या आहेत.
नाशिक जिल्हा
नांदगाव नगरपरिषदेत आमदार सुहास कांदे यांनी आपला गड राखला आहे. शिवसेना (शिंदे गट) चे सागर हिरे विजयी झाले असून शिवसेनेचे सर्व नगरसेवक उमेदवार निवडून आले आहेत. या ठिकाणी भाजपला एकही जागा मिळाली नाही.
पुणे जिल्हा
जेजुरी नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयदीप बारबाई विजयी झाले आहेत. जेजुरीत राष्ट्रवादीचे 17 नगरसेवक, भाजपचे 2 नगरसेवक तर 1 अपक्ष नगरसेवक विजयी झाला आहे. सासवड नगरपरिषदेत भाजपचे 13 तर शिवसेनेचे 9 नगरसेवक विजयी झाले असून भाजपच्या आनंदी जगताप नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.
अहमदनगर जिल्हा
शिर्डी नगरपरिषदेत महायुतीच्या उमेदवार जयश्री थोरात नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. तीन महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून दोन अपक्ष उमेदवारही निवडून आले आहेत.
नेवासा नगरपालिकेत 17 पैकी 10 जागांवर माजी आमदार शंकरराव गडाख समर्थक उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. सहा जागांवर महायुतीचे तर एका जागेवर आम आदमी पार्टीचा उमेदवार विजयी झाला आहे.
देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपने सत्ता कायम राखली असून नगराध्यक्षपदी भाजपचे सत्यजित कदम विजयी झाले आहेत. येथे भाजपचे 14 तर काँग्रेसचे 4 नगरसेवक विजयी झाले आहेत.
धुळे जिल्हा
पिंपळनेर नगरपरिषदेत भाजपच्या डॉ. विजया चौरे नगराध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत. पिंपळनेर नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकला असून शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
यवतमाळ जिल्हा
ढाणकी नगरपंचायतीत भाजपचे बहुसंख्य उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपसह शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि MIM चे उमेदवारही निवडून आले आहेत.
जळगाव : मुक्ताईनगर
मुक्ताईनगर नगरपंचायतीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मतदारसंघात खडसे कुटुंबाला धक्का बसला असून आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा 2561 मतांनी विजय झाला आहे. राज्यातील इतर नगर परिषद आणि नगरपंचायतींचे निकाल अद्याप येत असून मतमोजणी सुरू आहे. पुढील निकालांसह अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
