Anil Ambani : ईडीची मोठी कारवाई,अनिल अंबानी समूहाच्या 1,120 कोटींच्या मालमत्तेवर जप्ती

Anil Ambani : ईडीची मोठी कारवाई,अनिल अंबानी समूहाच्या 1,120 कोटींच्या मालमत्तेवर जप्ती

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एडीए समूहावर आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत ईडीने पुन्हा मोठी कारवाई करत तब्बल 1,120 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स एडीए समूहावर आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत ईडीने पुन्हा मोठी कारवाई करत तब्बल 1,120 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि यस बँक प्रकरणात निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर आणि फसवणूक झाल्याचा आरोप असताना, या जप्तीत 18 अचल मालमत्ता, मुदत ठेवी, बँक खात्यातील रक्कम आणि अप्रकाशित गुंतवणूक यांचा समावेश आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या सात, रिलायन्स पॉवरच्या दोन आणि रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या नऊ मालमत्ताही या कारवाईत आलेल्या आहेत.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वीच रिलायन्स कम्युनिकेशन्स, RHFL आणि RCFL संबंधित इतर प्रकरणांमध्ये 8,997 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. नवीन कारवाईनंतर एकूण जप्त रकमेचा आकडा आता 10,117 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तपासात ईडीला आढळले की 2017 ते 2019 दरम्यान यस बँकेने RHFL आणि RCFL मध्ये केलेली मोठी गुंतवणूक नंतर थेट NPA मध्ये बदलली. दोन्ही कंपन्यांवरील थकबाकी मिळून 3,300 कोटी रुपयांहून अधिक झाली.

ईडीच्या तपासात उघड झाले की रिलायन्स एडीए समूहाच्या विविध कंपन्यांनी सार्वजनिक निधीचा गैरवापर करत 11,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम साखळी व्यवहारांद्वारे आपल्याकडे वळवली. सेबीच्या नियमांमुळे रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंडला थेट मदत करता येत नसल्याने निधी यस बँकेमार्फत वळवण्यात आला असा आरोपही एजन्सीने केला आहे. याशिवाय 2010 ते 2012 दरम्यान रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि संलग्न कंपन्यांनी घेतलेल्या 40,000 कोटी रुपयांच्या कर्जाचाही मोठ्या प्रमाणावर गैरवापर झाल्याचे सीबीआयच्या प्राथमिक तक्रारीत नमूद आहे. किमान नऊ बँकांनी या खात्यांना फसवणूक म्हणून घोषित केले आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणावर कर्जांचे एव्हरग्रीनिंग करण्यात आले, संबंधित कंपन्यांकडे निधी वळवण्यात आला, काही रक्कम ठेवी आणि म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवून पुन्हा कंपनीतच वळवण्यात आली, तसेच परदेशी रकमेच्या हस्तांतरणातूनही निधी बाहेर ढकलला गेला. बिल डिस्काउंटिंगचा गैरवापर करून मोठ्या व्यवहारांना झाकण्यात आल्याचेही निष्पन्न झाले. ईडीने सांगितले की, या प्रकरणातील गैरव्यवहाराची रक्कम परत मिळवण्यासाठी आणि मोठ्या आर्थिक घोटाळ्यांमध्ये जबाबदारी निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरूच राहील. त्यांच्या मते, जप्तीची ही कारवाई त्या मोठ्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com