Shankaracharya Avimukteshwaranand
Shankaracharya Avimukteshwaranand

Shankaracharya Avimukteshwaranand : ममता कुलकर्णींचा शंकराचार्यांच्या धरनावर थेट हल्ला; अहंकार की आत्मज्ञान?

प्रयागराज येथे सुरू असलेला माघ मेळा यंदा केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित राहिलेला नाही. साधू-संत, आखाडे, परंपरा आणि प्रशासन यांच्यातील वादांमुळे हा मेळा सातत्याने चर्चेत आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

प्रयागराज येथे सुरू असलेला माघ मेळा यंदा केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित राहिलेला नाही. साधू-संत, आखाडे, परंपरा आणि प्रशासन यांच्यातील वादांमुळे हा मेळा सातत्याने चर्चेत आहे. अशातच आता किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांनी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या धरना-प्रकरणावर थेट आणि कठोर भूमिका मांडत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

माघ मेळ्यात यंदा ममता कुलकर्णी अनुपस्थित राहिल्याने विविध चर्चांना उधाण आले होते. या चर्चांवर अखेर त्यांनी मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, त्यांचे संपूर्ण आयुष्य सध्या साधना आणि तपश्चर्येला समर्पित आहे. गेल्या २५ वर्षांपासून त्या अखंड तप करत असून, रोज गंगाजलाने स्नान केल्यानंतरच पूजा-पाठ करतात. सध्या गुप्त नवरात्र सुरू असल्यामुळे या काळात कुठेही बाहेर न जाण्याचा संकल्प असल्यानेच त्या माघ मेळ्यात सहभागी होऊ शकल्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

या अनुपस्थितीचा कोणत्याही वादाशी संबंध नसल्याचे सांगत ममता कुलकर्णी यांनी धार्मिक नियम आणि वैयक्तिक साधना यांना प्राधान्य देत निर्णय घेतल्याचे नमूद केले. मात्र, याच मुलाखतीत त्यांनी शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या धरना-प्रकरणावर स्पष्ट शब्दांत टीका केली. माघ मेळ्यात पालकी रोखल्याच्या निषेधार्थ शंकराचार्यांनी केलेल्या धरन्यावर प्रतिक्रिया देताना ममता कुलकर्णी म्हणाल्या की, या निर्णयामुळे प्रत्यक्षात त्यांच्या शिष्यांचे मोठे नुकसान झाले. “स्नान करायचेच होते, तर पालकीतून उतरून पायी संगमापर्यंत जाता आले असते. गुरु असण्याचा अर्थ हट्ट नव्हे, तर संयम आणि जबाबदारी असते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्या पुढे म्हणाल्या की, अशा प्रकारच्या हट्टामुळे शिष्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. गुरुच्या निर्णयाचा परिणाम शिष्यांवर होतो, याचे भान असणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकरणात ते दिसून आले नाही, अशी टीका त्यांनी केली. कायदा आणि नियम याबाबत बोलताना ममता कुलकर्णी यांनी ठाम भूमिका मांडली. “कायदा सर्वांसाठी समान असतो. राजा असो, सामान्य माणूस असो, गुरु असो किंवा शिष्य नियम सगळ्यांनाच पाळावे लागतात,” असे त्यांनी सांगितले. केवळ चारही वेदांचे पाठ असणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाले असे होत नाही, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शंकराचार्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या संपूर्ण वादात अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा अहंकार स्पष्टपणे दिसून येतो आणि आत्मज्ञानाचा अभाव जाणवतो, असा आरोप करत ममता कुलकर्णी यांनी आपली भूमिका अधिक तीव्र केली. धार्मिक पदांवर असलेल्या व्यक्तींनी नम्रता आणि विवेक दाखवणे अपेक्षित असते, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, या वादाची पार्श्वभूमी १८ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या दिवशी घडलेल्या घटनेशी संबंधित आहे. ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सुमारे २०० शिष्यांसह पालकीत बसून संगम स्नानासाठी निघाले होते. मात्र, संगम परिसरात प्रचंड गर्दी असल्याने मेला प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव पालकीसह पुढे जाण्यास मनाई केली होती.

प्रशासनाने पालकी न नेता पायी जाऊन स्नान करण्याचा सल्ला दिला होता. पालकीसह पुढे गेल्यास चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा प्रशासनाचा अंदाज होता. मात्र, शंकराचार्य पालकीतूनच संगमात जाण्यावर ठाम राहिल्याने प्रशासन आणि त्यांच्या समर्थकांमध्ये सुमारे तीन तास तणावपूर्ण चर्चा झाली.

या घटनेनंतर माघ मेळ्यातील वातावरण तापले असून, साधू-संतांच्या भूमिकांवर आणि अधिकारांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. ममता कुलकर्णी यांच्या या परखड विधानांमुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात

  1. प्रयागराज येथे सुरू असलेला माघ मेळा यंदा केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित नाही.

  2. साधू-संत, आखाडे, परंपरा आणि प्रशासन यांच्यातील वादांमुळे हा मेळा सातत्याने चर्चेत आहे.

  3. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर ममता कुलकर्णी यांनी या वादावर थेट आणि कठोर भूमिका मांडली आहे.

  4. त्यांनी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या धरना-प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

  5. या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com