Manoj Jarange Maratha Protest : "...तर असं करणं फडणवीस तुम्हाला महागात पडेल" जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. पोलिसांनी आंदोलकांना मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली असली तरी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, आंदोलकांनी कोणताही कायदा मोडलेला नाही. त्यांनी समर्थकांना न्यायालयाच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, रस्त्यावर फिरून नागरिकांना गैरसोय होऊ नये, असे आवर्जून सांगितले.
जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारशी संवाद साधण्याची तयारी दर्शवली. त्यांनी स्पष्ट केले की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी ते सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडतील. आंदोलन शांततेत पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक समर्थकाने घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी उपोषण अधिक तीव्र केले होते, मात्र आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने सोमवारी संध्याकाळी काही घोट पाणी घेतल्याचे दिसून आले.
नोटिशीत पोलिसांनी परवानगी अटींचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला आहे. स्वयंपाक करणे, कचरा टाकणे, वेळेच्या बाहेर आंदोलन सुरू ठेवणे, तसेच शनिवार-रविवारी परवानगीशिवाय आंदोलन सुरू ठेवल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तरीही जरांगे यांनी पोलिसांच्या दाव्याला नाकारत सांगितले की आंदोलन नेहमी कायद्याच्या चौकटीतच झाले आहे.
'आंदोलनाला फक्त एक दिवसाची परवानगी होती. बाहेरुन येणाऱ्यांना वेशीवरच अडवा' असे आदेश कोर्टाने दिले होते. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, "आंदोलक म्हणतात की मुंबईकडे यायला लागले आहेत. तर कोर्टाने आदेश दिले की, मुंबईच्या वेशीवर त्यांना अडवल जाईल. मराठे ची पोट्टे आहेत. गनिमी कावा करून ते येतील. तुम्हाला कळणार पण न्हाई. सोमवार पर्यंत आंदोलन वाढले तर फडणवीस जबाबदार". असा थेट दावा जरांगे पाटील यांनी केला आहे.
"मराठ्याची अवलाद आहे. शनिवार रविवार मुंबईत मराठे आले तर सोमवारच आंदोलन खूप छान असेल. काय करता जेल मध्ये न्याल. आम्ही जेल मध्ये उपोषण करू पण सुट्टी नाही. एखाद्या समाजावर अन्याय होईल असे वागू नका. मराठ्यांना इथून काढून टाकणं ही काळजात तुटणारी सल. तसं करू देऊ नका फडणवीस तुम्हाला महागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावताहेत तेही घातक आहे".
"लाठीचार करायला समजत तर ते अती घातक ठरेल. तुमच्या नेत्यांना पण महाराष्ट्रात यायचं आहे. आम्ही शांत आहोत जे मार्ग काढता येईल ते काढा. आमचा अपमान करू नका सन्मान केला तर हे गरीब लोक विसरणार नाही. पण अपमान केला तर चिड निर्माण होईल. तुमच्यापेक्षा किंवा ज्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या अधिक पट आहे". तसेच पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत जरांगे म्हणाले की, "फडणवीस खोट वागत आहे. न्यायदेवेळा खोटी माहिती देतो, कुटीर डाव खेळतो.
जरांगे यांची ठाम मागणी कायम असून, मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करावे, तसेच हैदराबाद, सातारा, औंध आणि बॉम्बे गॅझेटमध्ये नमूद असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. त्यांनी सांगितले की ही लढाई समाजाच्या न्यायासाठी आहे आणि शेवटपर्यंत शांततेत लढली जाईल.