Manoj Jarange Maratha Protest : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण यशस्वी; मराठा समाजाच्या सहा मागण्या मान्य
पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण अखेर यशस्वी झाले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आठ पैकी सहा प्रमुख मागण्या मान्य करत त्यासंदर्भात सुधारित जीआर काढला. मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा जीआर जरांगे पाटलांना सुपूर्द करण्यात आला. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याची घोषणा केली.
जरांगे पाटलांनी उपोषण सोडताना समर्थकांना उद्देशून सांगितले, "आपल्यासाठी आजचा दिवस दिवाळीचाच आहे. तुम्ही सर्वांनी शांततेत आपल्या गावाकडे निघून जा. सरकारने जीआर दिला आहे, त्यामुळे आता आपला लढा यशस्वी झाला. परंतु जर शासनाने फसवणूक केली तर कोणत्याही नेत्याला फिरू देणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.
उपोषण सोडण्यामागचं कारण
राज्य सरकारने जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या आहेत. सुरुवातीला जीआरवर राज्यपालांची सही झालेली नसल्याने उपोषण सोडण्याचा निर्णय तासभर पुढे ढकलण्यात आला होता. मात्र राज्यपालांनी सही केल्यानंतर सुधारित जीआर जरांगे पाटलांना सुपूर्द करण्यात आला आणि त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले.
मान्य झालेल्या महत्त्वाच्या मागण्या
1. पहिली मागणी - हैद्राबाद गॅझेट लागू होणार
2.दुसरी मागणी – सातारा संस्थानचे गॅझेटही लागू होणार
3. तिसरी मागणी – सर्व केसेस मागे घेणार
4. चौथी मागणी – बलिदान दिलेल्यांच्या वारसांना नोकरी
5. पाचवी मागणी – ग्रामपंचायतीत नोंदींचे रेकॉर्ड ठेवणार
6. सहावी मागणी – कुणबी – मराठा एकच असल्याचा अभ्यास
जरांगे यांचा भावनिक उल्लेख
उपोषणस्थळी बोलताना त्यांनी लातूरमधील दोन तरुणांच्या आत्महत्येच्या प्रयत्नाचा आणि आणखी दोन तरुणांच्या आत्महत्येचा उल्लेख केला. "मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या कुटुंबांना मदत आणि नोकरी देणार आहेत," असे सांगून जरांगे पाटलांनी शांततेत गावाकडे परत जाण्याचे आवाहन केले.
आझाद मैदानावर जल्लोष
उपोषण मागे घेतल्याची घोषणा होताच आझाद मैदान गुलालाच्या उधळणीने दणाणून गेले. मराठा आंदोलकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला, घोषणाबाजी केली. "हीच खरी दिवाळी," असे म्हणत जरांगे यांनी सर्व आंदोलकांना रात्रीपर्यंत मुंबई सोडण्याचे आवाहन केले.
सरकारसोबत चर्चेची पार्श्वभूमी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून सतत हालचाली सुरू होत्या. राज्य सरकारच्या उपसमितीने जरांगे यांच्यासोबत चर्चा केली आणि अखेर सुधारित जीआर निघाला. यावर राज्यपालांची सही आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अखेर मराठा समाजाच्या लढ्याला मोठे यश मिळाले असून जरांगे पाटलांचे आंदोलन ऐतिहासिक ठरले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, "सरकारने दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी झालीच पाहिजे. नाहीतर पुन्हा मोठा लढा उभारला जाईल." आझाद मैदान रिकामे करण्याचे आवाहन होताच आंदोलक आपल्या गावाकडे परतण्यास निघाले. मराठा आरक्षणाच्या लढ्यातला हा निर्णायक टप्पा ठरला आहे.