Manoj Jarange Maratha Protest : आंदोलन संपलं! नवी मुंबईत मराठा आंदोलकांसाठी आलेल्या शिदोरीचा पुर; उरलेल्या अन्नाचं काय केलं?
मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाकरी आणि चटणीसह अन्नधान्याने भरलेले ट्रक नवी मुंबईत दाखल झाले. केवळ तीन दिवसांत तब्बल 10 लाख भाकऱ्या जमा झाल्या होत्या. चटणी, ठेचा, लोणचं, पाण्याच्या बाटल्या आणि अन्य गरजेच्या वस्तूंसह मोठ्या प्रमाणात शिदोरी आली. अखेर सिडको प्रदर्शन केंद्रात साठवलेल्या या शिदोरीची जागा अपुरी पडू लागली, त्यामुळे मदत बंद करण्याचं आवाहन आयोजकांना करावं लागलं.
"एक शिदोरी आंदोलकांसाठी" – राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद
आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील अनेक हॉटेल्स बंद होती, आणि आंदोलकांना पाण्याचीही टंचाई जाणवली. हे समजताच राज्यातील गावागावांतून "एक शिदोरी आंदोलकांसाठी" ही मोहीम सुरू झाली. प्रत्येक गावातून स्थानिक नागरिकांनी आपल्यापरीने भाकरी, पोळ्या, चटणी, ठेचा, लोणचं, भाजी, पाणी आणि फरसाण पाठवण्यास सुरुवात केली. मदतीचा ओघ इतका वाढला की सिडकोच्या प्रदर्शन केंद्रात चार वेगवेगळ्या ठिकाणी अन्न साठवण्याची व्यवस्था करावी लागली. खराब होणारी भाजी व अन्य अन्नपदार्थ वेगळे काढले जात होते आणि जेवण त्वरित आंदोलकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू होते. स्वयंसेवकांनीही या व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावली.
संपूर्ण शहराला पुरेल इतकी शिदोरी
जवळपास दहा लाख भाकऱ्या आंदोलनस्थळी पोहोचल्या. इतकं अन्न जमा झालं की ते संपूर्ण नवी मुंबईला पुरेल, असं दृश्य निर्माण झालं. त्यामुळे मंगळवारी मराठा समाजाच्या वतीने मदत थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं. शिधा इतका मोठ्या प्रमाणावर जमा झाला होता की अधिक मदतीची आवश्यकता उरली नव्हती.
उरलेलं अन्न गरजूंना वाटप
आंदोलनाच्या समाप्तीनंतर शिल्लक राहिलेल्या हजारो भाकऱ्या, चटणी, ठेचा, लोणचं आणि पाण्याच्या बाटल्या मुंबईतील विविध रुग्णालये आणि अनाथाश्रमांमध्ये वाटपासाठी देण्यात आल्या. उशिरापर्यंत हे अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलं.
दानाचा योग्य उपयोग
राज्यातील नागरिकांनी आपल्या आर्थिक क्षमतेनुसार शिदोरीसाठी वर्गणी गोळा केली होती. ही मदत वाया जाऊ नये म्हणून आंदोलकांनी उरलेले अन्न गरजूंपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. या अन्नसामग्रीत भाकरी, पोळ्या, चुरमुरे, चिवडा, फरसाण, ठेचा, खर्डा, लोणचं आणि पाणी यांचा समावेश होता. हे साहित्य सायन रुग्णालय, जे. जे. रुग्णालय, तसेच विविध अनाथाश्रमांमध्ये वितरित करण्यात आलं.