Aadesh Bandekar : आदेश बांदेकर पुन्हा नव्या रुपात येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'या' कार्यक्रमातून करणार पुनरागम
घराघरात आपली खास ओळख निर्माण करणारे सुप्रसिद्ध निवेदक, महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण यावेळी झी मराठी नव्हे तर स्टार प्रवाह वाहिनीवर. ‘माऊली महाराष्ट्राची’ या खास कार्यक्रमातून आदेश बांदेकर महाराष्ट्रातील वारी आणि वारकरी संस्कृतीचा अनोखा अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत.
आषाढी एकादशीनिमित्त तयार करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाचा प्रारंभ 23 जूनपासून होत असून, प्रत्येक सायंकाळी 6 वाजता याचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. नुकताच स्टार प्रवाहने या कार्यक्रमाचा प्रोमो सोशल मीडियावर प्रदर्शित केला असून, त्यात आदेश बांदेकर यांचा आवाज ऐकायला मिळतोय, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
2004 मध्ये सुरू झालेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम आदेश बांदेकरांच्या खास संवादशैलीमुळे आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वामुळे दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आला. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात आदेश बांदेकर हे नाव पोहोचले आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.
काही काळ ब्रेकनंतर आता ते नव्या रुपात आणि नव्या मंचावर परतत आहेत. ‘माऊली महाराष्ट्राची’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राची पारंपरिक वारी, भक्तीची परंपरा, आणि वारकऱ्यांची श्रद्धा यांचा संगम प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
स्टार प्रवाहच्या या कार्यक्रमामुळे पारंपरिक भक्ती आणि आधुनिक सादरीकरण यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. त्याचे सूत्रसंचालन आदेश बांदेकर करत असल्यामुळे हा कार्यक्रम विशेष ठरणार हे नक्की!