अक्षय खन्नाबद्दलच्या केलेल्या वक्तव्यावर संतोष जुवेकरचं स्पष्टीकरण, म्हणाला, "रोल किती, मी बोलतो किती?"
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये मराठी अभिनेता संतोष जुवेकरदेखील दिसून आला होता. यामध्ये त्याने रायाजीची भूमिका साकारली होती. मात्र आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता अक्षय खन्नाबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. याबद्दल आता एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये संतोषने या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अक्षय खन्नाविषयी केलेल्या वक्तव्यामुळे जे ट्रोलिंग केले गेले त्याबद्दल संतोष म्हणाला की. "माझ्यासाठी अक्षय खन्ना हा मोठा अभिनेता आहे. मला ट्रोल केलं म्हणून मी सारवासारव करतो असं नाही. लोक अर्धवट एकतात किंवा माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला गेला आहे. अक्षय खन्नाने याचित्रपटामध्ये औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. अक्षय कधीही प्रमोशनला आला नाही. त्याने कधीही मुलाखतीमध्ये हजेरी लावली नाही. पण त्याचा हा वैयक्तिक प्रश्न आहे. अक्षय खन्नाला हे सगळं करण्याची गरज नाही. तो मोठा अभिनेता आहे. आम्ही स्ट्रगलर आहोत".
पुढे तो म्हणाला की, "माझा सिनेमातील रोल किती, मी बोलतो किती?, पण तरीही मी बोलणार. 'छावा' चित्रपटाचा भाग असणं ही फार मोठी गोष्ट आहे. फार लोकांना हे भाग्य मिळत नाही. माझी महाराजांबद्दलची एक आस्था आहे. 'छावा' पुस्तक वाचून वाचून जो मला इतिहास कळला आहे त्याचा माझ्यावर प्रभाव आहे. मला ट्रोल करणारा तिथे असता तरीही त्यानेही हेच केलं असतं ही माझी खात्री आहे. पण म्हणून अक्षय खन्ना वाईट आहे असं नाही. मी सेटवर गेलो तेव्हा आमच्या असिस्टन्टने अक्षय सरांना भेटायचं आहे का? असं विचारलं. पण त्या गेटअपमध्ये बघून मला त्यांना भेटण्याची इच्छा नव्हती".
अक्षय सरांना भेटायचं नाही असं माझं बोलणं नव्हतं. पण मला ते बघवत नव्हतं. अक्षय खन्नाचा मेकअप, त्याची बॉडी लँग्वेज हे बघून कोणालाही चीड येईल. त्यावर मी माझं प्रामाणिक मत शेअर केले. पण यामुळे कळलं की अक्षय खन्नावर प्रेम करणारे अनेक जण आहेत". दरम्यान संतोषची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आली आहे.