त्र्यंबकेश्वर येथील मंदिरामध्ये कार्यक्रम करण्याच्या विरोधावर प्राजक्ता माळीचे भाष्य, व्हिडीओ शेअर म्हणाली, "अपुऱ्या माहितीमुळे..."
महाशिवरात्रीनिमित्ताने अनेक मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथेदेखील विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि सहकलाकार इथे शिवार्पणनस्तु नृत्य सादर करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध केला.
यासंदर्भात प्राजक्ता माळीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ती म्हणाली की, "यंदाच्या महाशिवरात्रीला काय करावं, असा विचार मनात घोळत असतानाच मला त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून फोन आला. ते म्हणाले की, आम्ही दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त मंदिराच्या प्रांगणामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर, नृत्यावर आधारित कार्यक्रम आयोजित करत असतो. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन आपली कला सादर करून गेले आहेत. 'फुलवती'च्या निमित्तानं आम्हाला कळलं की तुम्हीदेखील भरतनाट्यम नर्तिका आहात. तर यंदाच्या वर्षी तुम्ही शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम सादर कराल का? अर्थातच सगळ्या नृत्यकर्मींसाठी नटराज नृत्यदेवता आहेत, आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी अजिबात वेळ न घालवता तात्काळ होकार दिला".
पुढे प्राजक्ता म्हणाली की, "मी इथे आवर्जून नमूद करू इच्छिते की महाशिवरात्रीनिमित्त होणारा हा कार्यक्रम पूर्णपणे शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीतावर आधारित नृत्याचा कार्यक्रम आहे. मी स्वतः भरतनाट्यम नर्तिका आहे. मी विषारद केलं आहे. नृत्यामध्ये बीए. एमए केलं आहे. अपुऱ्या माहितीमुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्यांनी त्यांच्या मनातील किंतू-परंतु काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये, अशी मी त्यांना विनंती करते".
नंतर प्राजक्ता म्हणाली की, "देवाच्या दारामध्ये कोणीही सेलिब्रिटी नसतं, सगळे भक्त असतात आणि त्याच भक्तीभावाने मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजांच्या चरणी अर्पण करणार आहे. या कार्यक्रमाचं नाव शिवार्पणमस्तू असं आहे. सगळा शिवावर आधारित कार्यक्रम आहे. वेळेअभावी मी दोनच रचना सादर करणार आहे, बाकिच्या सगळ्या रचना माझे सहकलाकार सादर करतील. मी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे. गर्दी आणि चेंगराचेंगरीची भीती असेल, तर विश्वस्त आणि पोलीस जो निर्णय घेतली तो सामाजिक भान बाळगत सर्वांनाच बंधनकारक असेल".