Vivek Lagoo : मराठी ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन; कलाविश्वावर शोककळा
ज्येष्ठ मराठी अभिनेते विवेक लागू यांचे वृद्धापकाळाने निधन झाले असून, त्यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी 19 जून रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर 20 जून रोजी सकाळी 11 वाजता मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विवेक लागू हे प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांचे आधीचे पती होते. त्यांची कन्या मृण्मयी लागू- वायकुळ ही प्रसिद्ध लेखिका व अभिनेत्री आहे. विवेक लागू यांनी आपल्या कारकिर्दीत मराठी तसेच हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांनी अढळ स्थान मिळवले.
त्यांच्या उल्लेखनीय कलाकृतींपैकी ‘गोदावरीने काय केले’, ‘अग्ली’, ‘व्हॉट अबाउट सावरकर’, ‘31 दिवस’ हे चित्रपट विशेष गाजले. याशिवाय, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘हे मन बावरे’ या मालिका देखील लोकप्रिय ठरल्या. विवेक लागू आणि रीमा लागू यांची ओळख बँकेतील नाट्यस्पर्धांदरम्यान झाली होती. रीमा लागू आणि विवेक यांचं प्रेम हे विवाहात परावर्तित झालं आणि 1978 साली त्यांनी विवाह केला. मात्र काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी घटस्फोट घेतला. तरीही दोघांमध्ये परस्पर सन्मानाचे नाते कायम राहिले.
मृण्मयी लागूने 'थप्पड', 'स्कूप' यांसारख्या प्रोजेक्टमधून बॉलिवूडमध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. तिच्या 'मुक्काम पोस्ट लंडन' या मराठी चित्रपटाला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. विवेक लागू यांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीने एक अनुभवी, शांत, आणि गुणी कलाकार गमावला आहे.