Raj Thackeray : “मतदानात मॅच फिक्सिंग सुरू आहे” राज ठाकरेंचा गंभीर आरोप
थोडक्यात
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात निवडणूक प्रक्रियेतील केली.
“मतदान याद्या आहेत, पण मशीन्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
राज ठाकरे यांनी मतदान यंत्रणेत कसे गैरप्रकार होत आहेत याचे थेट डेमो मशीनद्वारे प्रेझेंटेशन सादर केले.
Mumbai: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात निवडणूक प्रक्रियेतील अनियमितता आणि ईव्हीएममधील गोंधळावर जोरदार प्रहार केला. “आज मी तुमच्यासाठी जादूचे प्रयोग आणले आहेत,” या शब्दांनी सुरुवात करत ठाकरे यांनी मतदान यंत्रणेत कसे गैरप्रकार होत आहेत याचे थेट डेमो मशीनद्वारे प्रेझेंटेशन सादर केले.
राज ठाकरे म्हणाले, “मतदान याद्या आहेत, पण मशीन्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये गोंधळ कसा होतो, हे महाराष्ट्रातील जनतेसमोर आणणार आहे.” त्यांनी प्रत्यक्ष दाखला देत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मतचोरीचे पुरावे दाखवले.
“गेल्या अनेक वर्षांपासून आपण ओरडून सांगतोय, पण कोणी ऐकत नाही. माझ्या सभांना गर्दी होते, पण मतांमध्ये ती दिसत नाही. लोक मत देतात, पण निकाल वेगळाच लागतो. हे सगळं मॅच फिक्सिंग आहे,” असा आरोप त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं, “पाच वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. मतदान याद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. निवडणुका पारदर्शक झाल्या की ज्याचा विजय होईल, तो आम्हाला मान्य आहे. पण इथे तर सगळं लपवून ठेवतात.”
ते म्हणाले, “मतदारांना प्रायव्हसी म्हणतात, पण स्वाभिमान गहाण ठेवून काय फायदा? नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘नमो टुरिझम सेंटर’ किल्ल्यांवर काढतात. हे कसं चालेल?"
राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही टीका केली, “मुख्यमंत्री व्हायचं म्हणून किती चाटूगिरी करायची?” असा टोला त्यांनी लगावला.
ठाकरे म्हणाले, “ही खूप मोठी लढाई आहे. महाराष्ट्राने नेहमी एक पाऊल पुढे टाकलं आहे आणि आता सुद्धा महाराष्ट्रच पुढे राहील. या सत्याच्या मोर्चात मी स्वतः लोकलने सहभागी होणार आहे. एक तारखेला मी आधीच येऊन थांबणार आहे.”
राज ठाकरेंनी सर्व नागरिकांना आवाहन केलं की, “हा मोर्चा दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रामाणिक मतदारांचा अपमान आता थांबला पाहिजे. जनतेच्या मनातील राग बाहेर काढा आणि या लढाईत सहभागी व्हा.”
राज ठाकरेंच्या या भाषणानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. त्यांच्या या विधानांमुळे आगामी निवडणुकांपूर्वी ईव्हीएम आणि मतदार याद्यांवरील विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता ‘सत्याचा मोर्चा’ किती व्यापक होतो आणि जनतेचा प्रतिसाद किती मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

