'छावा' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, मौलाना रझवींनी अमित शाह यांना लिहिले पत्र
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने देशभरात मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. मात्र आता हा चित्रपट हटवण्यात यावा अशी मागणी बरेलीमधील ऑल इंडिया जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रजवी यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्राद्वारे केली आहे. नागपूरमध्ये दगदफेकीचा हिंसक प्रकार झाला. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमधून हटवण्यात यावा असे त्या पत्रात लिहिले आहे.
'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देशातील वातावरण बदलले आहे. चित्रपटामध्ये औरंगजेबाला हिंदूंच्या विरोधात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे हिंदू जनतेला भडकावण्याचे काम सुरु आहे. असे मौलाना म्हणाले आहेत. त्यांनी अमित शाह यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले की, "तुम्हाला विनंती आहे की 'छावा' चित्रपटावर लवकरात लवकर बंदी आणावी. तसेच चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्माते आणि लेखकाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी. भारतातील मुसलमान औरंगजेबाला मानत नाही . त्यांना फक्त आम्ही शासक मानतो त्यापेक्षा जास्त काही नाही".
दरम्यान आता या मागणीवर कोणती कार्यवाही केली जाणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान आता चित्रपटामुळे खरच दंगे झाले का? असादेखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.