Mayuri Jagtap On Vaishnavi Case : 'दीर शशांक मलाही मारायचा, नणंद-सासूनं खूप छळलं, म्हणून मी...'; मयुरीनं सांगितली आपबिती

हगवणे कुटुंबातील थोरल्या सुनबाई मयुरी जगताप यांनीदेखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत.
Published by :
Rashmi Mane

वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर हगवणे कुटुंबात नव्याने वाद पेटल्याचे दिसून येत आहे. हगवणे कुटुंबातील थोरल्या सुनबाई मयुरी जगताप यांनीदेखील हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी लोकशाही मराठी चॅनेलसोबत संवाद साधताना आपबिती सांगितली.

मयुरी यांनी सांगितले की, “माझ्या पतीचा मला कायम पाठिंबा होता, मात्र सासू-सासरे मला सतत लहानसहान गोष्टींवरून त्रास द्यायचे, विविध वस्तूंची मागणी करत असत. लग्नात काय पाहिजे, काय नको, हे ते ठरवत असत. साडी कशी घ्यायची हे देखील नणंद करिष्मा हगवणेच्या सल्ल्यानुसार ठरत असे.”

माझी जाऊ वैष्णवी हगवणे हिला सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाची जाणीव होती, पण ती कधीच उघड बोलली नाही, असेही मयुरी म्हणाल्या. “मी तिला अनेकदा विचारायचे, पण ती घाबरायची" असे त्या म्हणाल्या.

त्यांच्यामते, वैष्णवीच्या मृत्यूला तिचे सासरचे लोक जबाबदार आहेत. “राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही,” असा आरोप करत मयुरी यांनी स्वतःच्याही अनुभवांची माहिती दिली. “माझ्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला होता. मी रेकॉर्डिंग करायचा प्रयत्न केला, पण माझा दीर शशांक हगवणे मोबाईल घेऊन पळून गेला. त्याने माझ्यावर दगडफेक केली, मारहाण केली,” असेही त्यांनी सांगितले.

“हगवणे कुटुंबीयांना मी नको होते. त्यांनी मला धमकी दिली की तुझ्या पतीचं दुसरं लग्न लावून देऊ. तू इथून निघून जा. मला त्यांच्याकडून खूप मानसिक त्रास झाला,” असे म्हणताना त्या अतिशय भावूक झाल्या.

मयुरी जगताप यांनी, “वैष्णवीच्या बाळाची जबाबदारी जर माझ्यावर सोपवली, तर मी ते पूर्ण प्रेमाने आणि जबाबदारीने सांभाळायला तयार आहे. मी त्याची आई होईन”, असेही म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com