Ajit Pawar : दोन रूपालींच्या भेटींनी अजित पवार गटात एकच खळबळ
राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेल्या “दोन रूपालींच्या वादाला” आता निर्णायक वळण मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या मध्यवर्ती कार्यालयात आज सकाळपासून सुरू असलेल्या बैठकीदरम्यान दोनही नेत्यांच्या भेटींची मालिका रंगली. सुरुवातीला रूपाली पाटील ठोंबरे या अजित पवार यांच्या भेटीसाठी कार्यालयात दाखल झाल्या. गेल्या काही दिवसांपासून ठोंबरे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यातील वादाने चांगलीच चर्चा रंगवली होती. या पार्श्वभूमीवर ठोंबरे यांनी आज अजित पवार यांच्यासमोर आपला पक्ष मांडला. ठोंबरे यांच्या भेटीनंतर अवघ्या दहा मिनिटांनी रूपाली चाकणकर सुद्धा त्याच कार्यालयात दाखल झाल्या.
अजित पवार यांच्या उपस्थितीत या दोघींच्या अनुक्रमे झालेल्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठी हालचाल सुरू झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चाकणकर Rupali Chakankar या आजच्या भेटीत राज्य महिला आयोगावर झालेल्या आरोपांबाबत आणि अलीकडच्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षनेत्यांशी चर्चा करणार आहेत. माध्यमांशी बोलताना सूत्रांनी सांगितलं की, “चाकणकर यांच्या भेटीनंतर त्या पत्रकारांशी संवाद साधतील. दोन्ही रूपालींमधील वादावर आज काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.”
पुण्यातील शिवाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आजचा दिवस पूर्णपणे राजकीय हालचालींनी व्यापलेला राहिला. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुरू असताना दोनही रूपालींच्या भेटीमुळे तणाव, अपेक्षा आणि चर्चांचा वातावरण आणखी रंगत गेलं आहे.

