Mumbai Megablock : मध्य, हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशीदरम्यान मध्य रेल्वेने आज, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रदद् राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
वेस्टर्न रेल्वे :
माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यासाठी शुक्रवार रात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत घेण्यात आलेल्या ब्लॉकदरम्यान पश्चिम रेल्वेने सुमारे शंभरहून अधिक लोकल फेऱ्या रद्द केल्या. परिणामी, प्रवाशांचे अतोनात हाल झाले सकाळी पीक अवरमध्ये उपनगरांमधून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागला. अनेकांना कार्यालयाची वेळ गाठता आली नाही. शुक्रवारी रात्री 10.23 नंतर डाउन आणि अप मार्गिकेवरील धिम्या लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रुझदरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात आल्या. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परेल, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड स्थानकांवरील प्रवाशांना मनस्ताप झाला. शनिवारी सकाळी साडेआठनंतर लोकल या स्थानकांवर लोकल थांबू लागल्या. नियोजित वेळापत्रक कोलमडल्याने बोरीवली, अंधेरी आणि विरारच्या प्रवाशांना लेटमार्क लागला.
मध्य रेल्वे :
सीएसएमटी ते विद्याविहार मार्ग - अप आणि डाउन धीम्या गतीने सकाळी 10.55 ते दुपारी 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकवेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाउन जलद मार्गावर धावणार आहेत. यामुळे मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर लोकल उपलब्ध राहणार नाही. काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे :
कुर्ला ते वाशी दरम्यान सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर / वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील काही लोकल २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.