lionel messi In Wankhede Stadium : वानखेडे स्टेडियमवर मेस्सीचं जंगी स्वागत, मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट 'महादेवा'चा शुभारंभ
(lionel messi In Wankhede Stadium) फुटबॉल विश्वातील महानायक लिओनेल मेस्सीने अखेर मुंबईत पदार्पण करताच वानखेडे स्टेडियमवर इतिहास घडला. क्रिकेटसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या मैदानावर फुटबॉलचा देव अवतरल्याचा अनुभव चाहत्यांनी घेतला. मेस्सीने वानखेडे स्टेडियममध्ये पाऊल टाकताच संपूर्ण परिसर ‘मेस्सी… मेस्सी…’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. गेल्या अनेक तासांपासून ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो क्षण सायंकाळी सुमारे सहा वाजता साकार झाला.
अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार, सात वेळचा बॅलन डी’ओर विजेता आणि आधुनिक फुटबॉलचा चेहरा मानला जाणारा लिओनेल मेस्सी सध्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात त्याने कोलकातामधून केली. कोलकातामध्ये मेस्सीने आपल्या पुतळ्याचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करत भारतीय चाहत्यांशी संवाद साधला. त्यानंतर भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो मुंबईत दाखल झाला.
मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये मेस्सीच्या स्वागतासाठी हजारो फुटबॉलप्रेमींनी गर्दी केली होती. स्टेडियमच्या आतच नव्हे तर बाहेरही चाहत्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. हातात अर्जेंटिनाचे झेंडे, मेस्सीचे जर्सी आणि मोबाईल कॅमेरे सज्ज ठेवून चाहते आपल्या लाडक्या खेळाडूची एक झलक टिपण्यासाठी उत्सुक होते.
या दौऱ्यादरम्यान एक महत्त्वाचा क्षणही साकार झाला. लिओनेल मेस्सी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेव’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. क्रीडा, विकास आणि प्रेरणा यांचा संगम साधणाऱ्या या प्रकल्पाच्या उद्घाटनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची भव्यता अधिकच वाढली. फुटबॉलचा जादूगार जेव्हा क्रिकेटच्या पंढरीत उतरला, तेव्हा त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी वानखेडे स्टेडियम सजले होते. मेस्सी स्टेडियममध्ये दाखल होताच चाहत्यांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. त्या वातावरणात मेस्सीनेही हात हलवत चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले.
यानंतर मेस्सीने भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या सुनील छेत्री याची भेट घेतली. दोघांची भेट ही भारतीय फुटबॉलसाठी अभिमानास्पद ठरली. मैदानावर मेस्सी आणि छेत्री यांनी एकमेकांना मिठी मारत आदर व्यक्त केला, ज्यामुळे उपस्थित चाहत्यांचा उत्साह आणखी द्विगुणित झाला.
मेस्सीच्या या मुंबई भेटीमुळे केवळ फुटबॉल चाहत्यांनाच नाही, तर संपूर्ण क्रीडाविश्वाला एक वेगळीच ऊर्जा मिळाल्याचं चित्र आहे. क्रिकेटसाठी ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर फुटबॉलचा देव अवतरल्याने, हा क्षण भारतीय क्रीडा इतिहासात कायम लक्षात राहील, यात शंका नाही.
थोडक्यात
फुटबॉल विश्वातील महानायक लिओनेल मेस्सीने अखेर मुंबईत पदार्पण करताच वानखेडे स्टेडियमवर इतिहास घडला.
क्रिकेटसाठी जगप्रसिद्ध असलेल्या या मैदानावर फुटबॉलचा देव अवतरल्याचा अनुभव चाहत्यांनी घेतला.
मेस्सीने वानखेडे स्टेडियममध्ये पाऊल टाकताच संपूर्ण परिसर ‘मेस्सी… मेस्सी…’च्या घोषणांनी दुमदुमून गेला.
गेल्या अनेक तासांपासून ज्याची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो क्षण सायंकाळी सुमारे सहा वाजता साकार झाला.

