Vitthal Rukmini Vivah : विठ्ठल–रुक्मिणीच्या मंगल विवाहाचे साक्षीदार झाले लाखो वारकरी

Vitthal Rukmini Vivah : विठ्ठल–रुक्मिणीच्या मंगल विवाहाचे साक्षीदार झाले लाखो वारकरी

“शुभमंगल सावधान… सावधान…” या मंगल घोषात आणि सनई–चौघड्यांच्या मधुर सुरांनी आज दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर नगरी अक्षरशः दुमदुमून गेली.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

“शुभमंगल सावधान… सावधान…” या मंगल घोषात आणि सनई–चौघड्यांच्या मधुर सुरांनी आज दक्षिण काशी म्हणून ओळखली जाणारी पंढरपूर नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर पार पडणाऱ्या श्री विठ्ठल–रुक्मिणीच्या अलौकिक शाही विवाह सोहळ्याने संपूर्ण पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. या दिव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले असून, वारकऱ्यांचा हा भक्तीसमुद्र पाहून पंढरीची शोभा द्विगुणीत झाली आहे.

या शाही विवाहासाठी श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात नेत्रदीपक आणि भव्य सजावट करण्यात आली आहे. यंदा तब्बल चार ते साडेचार टन विविध रंगीबेरंगी व सुवासिक फुलांचा वापर करून मंदिराला मखमली साज चढवण्यात आला आहे. ही पुष्पसेवा विठ्ठल भक्त भारत दिनी भुजबळ यांनी अर्पण केली असून, सुमारे शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र परिश्रम घेत मंदिराला स्वर्गीय प्रांगणाचे रूप दिले आहे. फुलांच्या दरवळात विठ्ठलाचा गाभारा अधिकच तेजोमय दिसत असून, ते रूप डोळ्यांत साठवण्यासाठी भक्तांची रांग थांबायचे नाव घेत नाही.

विवाह सोहळ्यासाठी विठूरायाला राजेशाही थाटात सजवण्यात आले आहे. रेशमी पगडी, त्यावर डोलणारे मोरपीस आणि पारंपरिक सुवर्ण दागिन्यांनी विठ्ठलाचे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. दुसरीकडे, माता रुक्मिणीला सुंदर जरीकाठची साडी नेसवून नक्षीदार दागिन्यांनी अलंकृत करण्यात आले आहे. हे तेजोमय रूप पाहताच भक्तांच्या ओठांवर “रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी” हा अभंग आपसूकच उमटत आहे.

मकर संक्रांतीच्या दिवशी पार पडलेल्या हळदी–कुंकवाच्या सोहळ्यानंतर आजचा विवाह उत्सव भक्तिभावाच्या शिखरावर पोहोचला. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात आणि शास्त्रोक्त विधींनी हा मंगल विवाह पार पडत असताना, भाविकांनी अक्षतांचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला. सनईच्या सुरांनी आसमंत भारावून गेला असून, प्रत्येक वारकऱ्याला आपण स्वतः विठ्ठलाच्या लग्नातील वर्‍हाडी आहोत, अशीच भावना मनात दाटून आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com