Shambhuraj Desai
Shambhuraj Desai

"शिंदे शिवसेनेत आमदारांचा आणि मंत्र्यांचा योग्य समन्वय"; शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण

आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे राजकीय वातावरण तापलं असून या प्रकरणावर शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय.
Published by :
Team Lokshahi

विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये जोरदार राडा झाल्याचं समोर आलं आहे. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यानंतर आमदारांमध्ये समन्वय साधण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये झालेल्या वादामुळे विधिमंडळ परिसरात राजकीय वातावरण तापलं असून यावर शंभुराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय. शिंदे शिवसेनेत आमदारांचा आणि मंत्र्यांचा योग्य समन्वय आम्ही ठेवला आहे, असं म्हणत देसाई यांनी घडलेल्या सर्व प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिलीय.

माध्यमांशी संवाद साधताना देसाई म्हणाले, "बोलताना थोडासा आवाज वाजणं म्हणजे वाद झाला असं नाही. योगायोगानं मी तिथे होतो. वाढत्या आवाजात एकमेकांच्यात चर्चा सुरु आहे, हे मला जेव्हा समजलं, तेव्हा मी दोघांनाही लॉबीमध्ये घेऊन गेलो. लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदारांनी त्यांचा विषय मला सांगितला. मंत्री महोदयांनी त्या कामातली अडचण सांगितली. आमचं तिघांचं असं ठरलं, की हे कामकाज संपलं की उद्या आपण बसू. असं देसाई माध्यमांशी बोलताना म्हणाले.

"आमदारांचं जनहिताचं काम आहे. त्यांचं वैयक्तिक काम नाही. आमदार बाहेरील लॉबीमध्ये होते. मतदार संघातले प्रश्न असतात. बाहेरच्या लॉबीत गर्दी खूप असल्याने आमदारांना कदाचित असं वाटलं असेल मत्र्यांपर्यंत आवाज जाणार नाही. म्हणून कदाचित त्यांचा आवाज थोडासा मोठा झाला असेल, मी त्यांच्या बरोबर होतो. त्यांच्यात चिडाचीड, एकमेकांना भिडणं, असं काहीही घडलं नाहीय. उद्या आम्ही दोन्ही मंत्री त्यांना घेऊन बसू आणि त्यांचं जे जनहिताचं काम आहे, ते उद्याच्या उद्या मार्गी लावलं जाईल. शिंदे शिवसेनेत आमदारांचा आणि मंत्र्यांचा योग्य समन्वय आम्ही ठेवला आहे, असंही ते म्हणाले."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com