Ravindra Waikar
Ravindra Waikar

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! आमदार रविंद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करणार

लोकसभा निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Published by :

लोकसभा निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार असतानाच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जोगेश्वरी पूर्वचे ठाकरे गटातील आमदार रविंद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज रात्री शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर असलेले वायकर शिंदे गटात सामील होत असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. आणखी एक विश्वासू साथीदार ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर ईडीच्या रडारवर होते.

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण काय आहे?

जोगेश्वरीच्या मजासवाडी भागात १३ हजार ६७४ चौरस फुटांचा भूखंड मुंबई महापालिकेच्या मालकीचा आहे. हा भूखंड मैदानासाठी आणि रुग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. या राखीव भूखंडावर रविंद्र वायकर यांनी फाईव्ह स्टार हॉटेल बांधल्याचा आरोप आहे. या बांधकामासाठी वायकरांनी महापालिकेकडून परवानगी घेतली नसल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांची चौकशी सुरु आहे. ईडीकडून वायकर यांच्या घरावर छापाही टाकण्यात आला होता.

ठाकरे गटातील महत्त्वाच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा ठाकरे गटातील बडे नेते शिंदेंच्या गळाला लागणार असल्याची चर्चा आहे. वायकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर ठाकरे गटाची पुढील राजकीय भूमिका काय असणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com