Raj Thackeray : राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; "मी आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, मग... "
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील रंगशारदा सभागृहात घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यात आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थेट तयारीला लागण्याचा आदेश दिला. गेल्या काही महिन्यांपासून मनसेच्या रणनीतीविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र या मेळाव्यात राज ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतल्याने आणि कार्यपद्धती सांगितल्याने मनसे पुन्हा निवडणूक रेषेवर सज्ज होताना दिसते.
राज ठाकरे म्हणाले, “निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा. आपण आणि उद्धव ठाकरे 20 वर्षांनंतर एकत्र येऊ शकतो, तर मग तुमच्यात हेवेदावे ठेवू नका. एकत्रित कामाला लागा. युती संदर्भात काय करायचं, त्याचा निर्णय मी घेईन.” या वक्तव्यातून त्यांनी पक्षातील गटबाजी, स्थानिक पातळीवरील वाद आणि नेतृत्वावर असलेले प्रश्न दूर करत सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. पुढे ते म्हणाले, “मतदार याद्यांवर विशेष लक्ष द्या. जुने कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना सोबत घ्या. विनाकारण कोणालाही मारू नका. आधी समजावून सांगा. मराठी शिकायला, बोलायला तयार असेल तर शिकवा. उरमट बोलत नसेल तर वाद घालू नका. उरमट बोलला तर पुढे तशी भूमिका घ्या. व्हिडिओ काढू नका.”
राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर, आगामी काळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांच्यात युती होणार का? यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांमुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, संघटनबांधणीची दिशा आता स्पष्ट झाली आहे. युती होईल की नाही, हे येणाऱ्या काळात ठरेल. पण राज ठाकरे यांनी दिलेला संकेत मात्र लक्षवेधी आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले,
“माजी पदाधिकारी, काही उमेदवार, काही घरी बसलेले आहेत. तुमच्यात पटत नाही, आवडत नाही, असं करून चालणार नाही. कार्यकर्ता आपला आहे आणि तो जर सोबत येत असेल तर त्याला विश्वास द्या. पुढची वाटचाल एकमेकांना सोबत घेऊन करायची आहे.” ते पुढे म्हणाले, “मतदार याद्यांबाबत त्यांनी (राज ठाकरे) स्पष्ट सूचना दिल्या आहेत. जे दुबार मतदार होतात ते महत्त्वाचे आहेत. काही लोक येथे आणि काही इतर राज्यात मतदान करतात. त्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे.”
मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,
“राजसाहेबांनी विस्तृत मार्गदर्शन दिलं. मतदार यादीत काम करायचंय, बीएल कुठे नेमायचे, मतावर काय काम करायचं यावर ते स्पष्ट बोलले. घोळ होऊ नये म्हणून प्रिकॉशन घ्या. काळजी घ्या.” ते म्हणाले, “निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जो कटाक्ष हवे आहे तो आता घेतला जातोय. आमची आंदोलने आक्रमक असतात. मराठी आमच्या डीएनए मध्ये आहे. संघटन मजबूत करायचंय. जे जुने पदाधिकारी सोडून गेले, निष्क्रिय आहेत, त्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.”
मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले,
“आज सन्माननीय राजसाहेबांनी स्पष्ट सांगितलं की, महाराष्ट्र सैनिक म्हणून प्रत्येक पदाधिकाऱ्याने काम करायचंय. पक्षाची ध्येयधोरणे, आंदोलने तळागाळापर्यंत पोहोचवायची आहेत. प्रत्येक वॉर्डात काम करायचं आहे.” ते पुढे म्हणाले, “वर्तमानात किंवा भविष्यात काय करायचं ते मी (राज ठाकरे) बघीन, असं त्यांनी सांगितलं. तुम्ही मतभेद बाजूला ठेवा. एकाच झेंड्याखाली काम करा. मोठं व्हायचं असेल तर झेंड्याखाली राहा. पिरॅमिड उभं करायचंय आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” अभ्यंकर पुढे म्हणाले, “ठाकरे हा ब्रँड नाही, तो विचार आहे. 12 कोटी महाराष्ट्रवासीयांच्या मनात ठाकरे आहेत. यश, पैसा हे नंतरचं आहे. ठाकरे संपवायचा प्रयत्न काही लोक करतायत, ते अयोग्य आहे. भाषेवरून दंगे घडवण्याचा प्रयत्न चालतोय का, अशी शंका येते.”