Rain Alert : मुंबई व कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
थोडक्यात
25 आणि 28 ऑक्टोबरला पावसाचा येलो अलर्ट जारी
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस
अवकाळी पावसाने राज्यात मान्सून परतला असला तरी पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra), मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 'पुढील तीन ते चार दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अवकाळीचा अंदाज आहे'. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.जोरदार पावसामुळे पुणे (Pune), सातारा (Satara) आणि कराडमध्ये (Karad) अचानक झालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.l
मुंबई व कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता
मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी आकाश ढगाळ राहणार असून, संध्याकाळी किंवा रात्री वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईतील तापमानात थोडी घट नोंदवली जाईल. कमाल तापमान सुमारे 36 अंश सेल्सिअस आणि किमान 25 अंश सेल्सिअस इतके राहील. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून, या भागांत जोरदार सरींची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितले की, पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर सोलापूर आणि सांगलीमध्ये वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही सरी
नाशिक, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पाऊस होण्याची शक्यता असून, या चारही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. 25 ऑक्टोबरपासून उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागांतही पावसाची शक्यता कायम राहील.मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमध्ये 24 ऑक्टोबर रोजी जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे. 25 ऑक्टोबर रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड वगळता उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे.
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस
विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी येऊ शकतात. हवामान तज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राचा परिणाम 27 ऑक्टोबरपर्यंत राज्यावर जाणवणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वीजांचा कडकडाट सुरू राहू शकतो.
राज्यातील नागरिकांनी हवामान खात्याच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक ती तयारी ठेवावी, अशी सूचना देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनीही पिकांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, कारण पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
