PM Modi On Donald Trump : ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयावर मोदीचं ठाम प्रत्युत्तर; "प्रत्येक किंमत मोजायला..."
Modi Vs Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर भारताला दिलेली धमकी खरी ठरवत मोठं पाऊल उचललं आहे. भारतावर 25 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली असून, ही करवाढ येत्या 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. त्यामुळे अमेरिकेचा भारतावर एकूण आयात कर 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही कारवाई भारताच्या रशियाकडून होत असलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या तेल खरेदीमुळे करण्यात आल्याचं ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भात एक्स (माजी ट्विटर) वर एक आक्रमक पोस्ट करत भारतावर थेट निशाणा साधला. त्यांनी लिहिलं, “India is not only buying massive amounts of Russian Oil, they are then, for much of the Oil purchased, selling it on the Open Market for big profits. They don't care how many people in Ukraine are being killed by the Russian War Machine. Because of this, I will be substantially raising the Tariff paid by India to the USA.”
या पोस्टनंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली. भारताने मात्र यावर संयम राखत थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख न करता याला ठाम प्रत्युत्तर दिलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, “आमच्यासाठी आमच्या शेतकऱ्यांचे कल्याण हेच सर्वोच्च प्राधान्य आहे. भारत कधीही आपल्या शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड करणार नाही. आम्ही सतत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, शेतीवरील खर्च कमी करणे आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी काम करत आहोत.”
इतकंच नव्हे तर, त्यांनी आणखी ठाम भूमिका घेत सांगितलं की, “या भूमिकेची मला वैयक्तिक पातळीवर मोठी किंमत मोजावी लागेल, तरीही मी प्रत्येक किंमत मोजायला तयार आहे.”
भारत सरकारने याआधी ट्रम्प यांच्या आरोपांवर उत्तर देताना सांगितलं होतं की, ज्या रशियाच्या नावावरून ट्रम्प भारतावर टीका करत आहेत, त्याच रशियाकडून अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून अजूनही मोठ्या प्रमाणावर कच्चा माल आणि इंधनाची आयात होत आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जगभरात ऊर्जा संकट उभं राहिलं आणि त्यात भारताला तेलाचा स्थिर आणि परवडणारा स्रोत म्हणून रशियाकडे वळावं लागलं. त्यामुळे भारताची रशियाकडून तेल खरेदी ही रणनीतिक गरज होती, असं भारताने स्पष्ट केलं आहे.
अमेरिकेच्या या निर्णयामुळे सध्या भारत हा सर्वाधिक आयात टॅरिफ भोगणारा देश बनला आहे. भारतावर ५० टक्के टॅरिफ लादण्यात आलं असून, यापेक्षा कमी दराने इतर अनेक देशांवर टॅरिफ आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तानवर १९ टक्के, श्रीलंकेवर २० टक्के, म्यानमारवर ४० टक्के, स्वित्झर्लंडवर ३९ टक्के, आणि सीरियावर ४१ टक्के आयात शुल्क आहे. मात्र भारताला ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लादल्याने व्यापारसंबंधात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
या टॅरिफनंतर भारत आणि अमेरिकेमधील व्यापार करारावरही परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. भारताने आपल्या डेअरी आणि कृषी क्षेत्रावर कोणतीही तडजोड न करता अमेरिकेच्या मागण्या नाकारल्या. अमेरिकेने या क्षेत्रांना उघडं करण्याची मागणी केली होती, परंतु भारताने स्पष्ट सांगितलं की हे क्षेत्र उघडण्यात येणार नाही. यामुळेच ट्रेड डीलही फिस्कटल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
सध्या भारत सरकारने आपल्या धोरणांवर ठाम राहून शेतकरी, मच्छीमार, पशुपालक यांच्या हितासाठी कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतावर दबाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात दोन्ही देशांतील व्यापार आणि राजकीय संबंध कुठल्या वळणावर जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.c