Monkeypox : राज्यात मंकी पॉक्सने डोकं वर काढले! महाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळला; प्रशासन सतर्क
The first patient of Monkeypox : राज्यात मंकी पॉक्सचा शिरकाव झाल्याचे अखेर निश्चित झाले असून, महाराष्ट्रातील पहिला रुग्ण धुळे शहरात आढळल्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. सौदी अरेबियातून परतलेल्या एका ३० वर्षीय व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून, त्याला तातडीने विलगीकरण कक्षात हलवण्यात आले आहे.
हा रुग्ण २ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियातून आपल्या मुलीच्या लग्नासाठी धुळ्यातील गरीब नवाज नगर येथे आला होता. सौदीत गेली चार वर्षे वास्तव्यास असलेल्या या व्यक्तीला भारतात आल्यावर त्वचेवर गाठ-फोडी व जळजळ होण्यासारखी लक्षणं जाणवू लागली. त्यानंतर तो ३ ऑक्टोबरला हिरे शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी दाखल झाला.
एनआयव्हीकडून दुहेरी पुष्टी
हिरे रुग्णालयातील डॉक्टरांनी लक्षणांवरून मंकी पॉक्सचा संशय घेत, त्याचे रक्ताचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवले. प्राथमिक आणि दुसऱ्या दोन्ही तपासणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यामुळे ही केस अधिक गंभीर समजली जात असून, तातडीने खबरदारी घेण्यात आली आहे.
प्रशासन अलर्ट मोडवर
रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात तातडीने माहिती देण्यात आली आहे. रुग्णाला मधुमेह असल्यामुळे त्याच्या उपचारात अतिरिक्त काळजी घेतली जात आहे.
मंकी पॉक्सचा 'क्लेड-1' प्रकार?
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंकी पॉक्स व्हायरसचे दोन प्रकार असतात. त्यातील क्लेड-1 हा प्रकार अत्यंत संसर्गजन्य मानला जातो. भारतात आतापर्यंत अशा प्रकारच्या ३५ रुग्णांची नोंद झाली असून, महाराष्ट्रातील ही पहिली केस असल्याचे एनआयव्हीने स्पष्ट केले आहे.
सतर्कतेचे आवाहन
धुळेतील या घटनेनंतर राज्यातील इतर जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सर्व जिल्ह्यांना मंकी पॉक्स संदर्भात नियमित तपासणी, लक्षणे ओळखणे व संपर्क ट्रेसिंग याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.