Monsoon Session Of Parliament 2025 : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; तारखांसह किरेन रिजिजूंनी केली 'ही' महत्त्वाची घोषणा
सामान्यतः देशाचा किंवा राज्याचा कारभार कसा चालू आहे, याचा आढावा घेऊन एक औपचारिक बैठक घेतली जाते. यात चर्चा, विचारविनिमय आणि निर्णय घेतले जातात. यालाच अधिवेशन असे म्हणतात. यंदाचे 2025 चे संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलै ते 12 ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी माध्यमांना दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक असं ठरणार आहे. या अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. 21 जुलैला सकाळी अकरा वाजता पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाची सुरुवात होईल, असं यावेळी मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
यावेळी महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा, राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे आणि विविध धोरणात्मक विषयांवर संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आताच झालेल्या ऑपरेशन सिंदूरवरही चर्चा केली जाणार आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या संसदीय कामकाज समितीने या तारखा निश्चित केल्या असल्याचे प्रतिपादन मंत्री किरेन रिजिजू यांनी केले. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी विरोधीपक्षांच्या नेत्यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नियमांनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान यातील सर्व मुद्द्यांवर चर्चा करू, असे मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. त्यामुळे आता विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत पावसाळी अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.