Siddhesh kadam : वायु प्रदूषण नियंत्रणासाठी MPCB ची धडक कारवाई! 19 RMC प्लांट्स बंद
मुंबई महानगर प्रदेश (MMR) क्षेत्रातील वायूप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मोठी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेदरम्यान 19 RMC प्लांट्सवर उत्पादनबंदीची कारवाई करण्यात आली आहे. MPCB चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी स्पष्ट केले की, “वायु प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई सुरू राहणार आहे.”
MMR मध्ये वायू गुणवत्ता निरीक्षणाची व्यवस्था
MPCB कडे एकूण 32 CAAQMS (Continuous Air Quality Monitoring System) केंद्रे कार्यरत आहेत.
यापैकी 14 केंद्रे मुंबईत, तर उर्वरित ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेलमध्ये.
या केंद्रांद्वारे Real Time AQI (हवा गुणवत्ता निर्देशांक) मोजला जातो व 'समीर' अॅपद्वारे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसारित केला जातो.
राज्यभरात 22 मोबाइल मॉनिटरिंग व्हॅन कार्यरत आहेत, ज्याद्वारे हॉटस्पॉट्स, RMC आणि बांधकाम प्रकल्पांमध्ये वायु गुणवत्ता तपासली जाते.
उद्योगांवर कारवाईचे प्रमुख ठिकाणे
सर्वेक्षणादरम्यान आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने देवनार, गोवंडी क्षेत्रातील चार आरएमसी उद्योगांना (मे. ओम गेहलोत ऑपरेटर, मे. एनसीसी लि., मे. रामकी इन्फ्रास्ट्रक्चर लि., मे. एनए कन्ट्रक्शन प्रा. लि.) कारखाना बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे व तीन उद्योगांची प्रत्येकी पाच लाख रुपये बँक हमी जप्त करण्यात आली आहे.
संजयगांधी नगर, सायन, मुंबई येथील तीन अनधिकृत मेटल प्रोसेसिंग भट्टया असलेल्या उद्योगांना कारखाना बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सदर भट्टया निष्कासीत करण्यात आलेल्या आहेत.
वडाळा- माहुल येथील सर्वेक्षणादरम्यान एमबीपीटी रस्त्याच्याकडेने काही ठिकाणी संध्याकाळच्या वेळी कचरा जाळला जात असल्याचे आढळून आल्याने, सदरबाबत तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याकरीता मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाला निर्देश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर सर्वेक्षणात ठाणे येथील 8, नवी मुंबई येथील 6 तर कल्याण येथील 1 आरएमसी प्लान्ट निर्देशांचे उल्लघन केले असल्याने बंद करण्यात आले आहेत. याप्रकारे एमएमआर क्षेत्रात एकुण 19 आरएमसी उद्योगावर या प्रकारे उत्पादन बंदीची कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे – 8 RMC प्लांट्स बंद
नवी मुंबई – 6 RMC प्लांट्स बंद
कल्याण – 1 RMC प्लांट बंद
मुंबई महानगर प्रादेशिक क्षेत्रातील वायु प्रदूषण नियंत्रणाकरीता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने धडक मोहिम हाती घेतली असून निर्देशीत नियमांचे अनुपालन न करणा-या उद्योगांवर बंदची कारवाई केली असून या पुढेही ही सर्वेक्षणाची मोहिम सातत्याने कार्यरत राहिल असा विश्वास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी व्यक्त केला आहे. मंडळाचे सदस्य सचिव श्री. एम. देवेंदर सिंह हे दैनंदिन सर्वेक्षणाचा अहवाल घेत असून यामध्ये उद्योगाने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
