Mrityu Ek Atal Satya: 'मृत्यू - एक अटळ सत्य' सद्गुरूंच्या नव्या पुस्तकाचे प्रकाशन
सद्गुरूंचे नवीन पुस्तक 'मृत्यू - एक अटळ सत्य' काल सायंकाळी सकाळ प्रकाशन आणि ईशा लाईफ यांच्या वतीने लाँच करण्यात आले. हे पुस्तक २०२० मध्ये इंग्रजीत प्रकाशित झालेल्या बेस्टसेलर 'डेथ - अॅन इनसाइड स्टोरी' या पुस्तकाचे मराठी भाषांतर आहे.
पुण्यातील सेनापती बापट रोडवरील सिम्बायोसिस विश्वभवनच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या या कार्यक्रमासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रख्यात लेखक आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी, चाणक्य मंडळ परिवाराचे संस्थापक-संचालक श्री अविनाश धर्माधिकारी आणि सकाळ प्रकाशनचे प्रमुख श्री. आशुतोष रामगीर उपस्थित होते.
यावेळी मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले की, “सदगुरु आध्यात्मिक प्रेरणा देत असताना त्यांच्याकडे असे काही लवचीम्बक आहे की जगभरातील तरुणवर्ग त्यांच्या अशीर वचनासाठी उत्सुक आहे. त्यांनी मृत्यू विषयी केलेलं चिंतन म्हणूनच अधिक प्रभावी आणि नव्या पिढीला विचार करायला भाग पाडणारे असेल असा मला विश्वास आहे. मृत्यू हा अटळ आहे, त्याच्या पासून कोणाचीही सुटका नाही हे चिरंतन तत्व भारतीय तत्वज्ञानात खूप आधीपासून मांडले गेलेले आहे. तरीही ते पुन्हा सांगण्याची आवश्यकता आहे, कारण जर मृत्यू हे अटळ सत्य असेल तर मृत्यू पूर्वीचे जीवन कसे असायला पाहिजे, ते कसे जगायला पाहिजे, हे समजण्यासाठी त्याचा निश्चितपणे उपयोग होऊ शकतो,”
यासोबतच प्रा. मिलिंद जोशी यांनी म्हटले आहे की, “मृत्यू या शब्दाचे अनेक सकारात्मक पैलू आहेत आणि जर आपण ते आपल्या जीवनात आत्मसात केले तर ते आपल्या जीवनशैलीत बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे त्या संदर्भात सद्गुरूंनी या पुस्तकाद्वारे जे स्पष्ट केले आहे ते मला खूप मौल्यवान वाटते.” “आपल्या जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर काय घडते आणि त्यामधील प्रत्येक गोष्ट सद्गुरूंनी खूप सुंदरपणे स्पष्ट केली आहे,” तरुण प्रेक्षकांना उद्देशून त्यांनी सल्ला दिला, "आजच्या रंगीबेरंगी जगात, तरुणांनी विचार केला पाहिजे आणि काय क्षणभंगुर आहे आणि काय कायमचे आहे हे ओळखले पाहिजे.
सद्गुरूंच्या समाजातील प्रचंड योगदानाविषयी बोलताना श्री. अविनाश धर्माधिकारी म्हणाले, "मी इंग्रजी आवृत्ती आधीच वाचली होती. इंग्रजी पुस्तक उत्कृष्ट आहे, परंतु अशा विषयाला व्यक्त करण्याची आपल्या भाषेची नैसर्गिक क्षमता असल्याने हे मराठी पुस्तक अधिक लोकप्रिय होईल असे मला वाटते."
या पुस्तकाचे हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू आणि तमिळ भाषेतही भाषांतर झाले आहे. शिवाय, या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती आता अमेरिकेतील पेंग्विन रँडम हाऊसद्वारे प्रकाशित केली जाणार आहे. सकाळ प्रकाशनने प्रकाशित केलेले हे सद्गुरूंचे चौथे मराठी पुस्तक आहे.