Sikandar Film : मल्टिप्लेक्सचे शो रद्द, मात्र सिंगल थिएटर्सवर हाऊसफुल्लचा बोर्ड

Sikandar Film : मल्टिप्लेक्सचे शो रद्द, मात्र सिंगल थिएटर्सवर हाऊसफुल्लचा बोर्ड

चित्रपटाने जगभरात १५८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली असून एक-दोन नव्हे तर तीन कमाईचे रेकॉर्ड बनवले आहेत.
Published by :
Rashmi Mane
Published on

ईदच्या मुहुर्तावर जगभरात प्रदर्शित झालेला साजिद नाडियालवाला सलमान खान अभिनीत सिकंदर चित्रपट गुरुवार प्रदर्शानाच्या चौथ्या दिवशीही जोरदार कमाई करत आहे. चित्रपटाच्या कथानकाला समिक्षकांच्या टीकेला सामोरे जावे लागत असले तरी सलमान खानच्या चाहत्यांनी मात्र चित्रपटगृहात गर्दी केल्याने बॉक्स ऑफिसवर सिकंदर जबरदस्त कमाई करत आहे. निर्मात्यांच्या मते, चार दिवसांत या चित्रपटाने जगभरात १५८ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. एवढेच नाही तर त्याने एक-दोन नव्हे तर तीन कमाईचे रेकॉर्ड बनवले आहेत.

ए आर मुरुगादास दिग्दर्शित सिकंदर चित्रपटाकडे मल्टिप्लेक्स प्रेक्षकांनी पाठ फिरवली असली तरी सिंगल थिएटर्समध्ये मात्र हाऊसफुल्लचा बोर्ड पाहायला मिळत आहे. एकीकडे मल्टिप्लेक्समधील ११०० शोज रद्द झाले असताना मुंबईत सलमानच्या चाहत्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे पुन्हा एकदा सिंगल थिएटर्स खुले झाले आहेत. निर्मात्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 'सिकंदर'ने चार दिवसांत जगभरात १५८.५० कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. चौथ्या दिवशी चित्रपटाने देशात १३.८५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर परदेशात ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मंगळवारी त्याने देशात २७.१६ कोटी रुपये आणि परदेशात ८.१० कोटी रुपये कमावले होते. तर सोमवारी ईदच्या दिवशी देशात ३९.३७ कोटी रुपये तर परदेशात ११.८० कोटी रुपयांची कमाई झाली.

'सिकंदर'ने चार दिवसांत देशात ८४.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे आणि १००.२५ कोटी रुपयांचे एकूण कलेक्शन केले आहे. परदेशात ४० कोटी रुपयांची एकूण कमाई झाली आहे. अशा प्रकारे देशांतर्गत आणि परदेशासह जगभरातील एकूण कमाई १४०.२५ कोटी रुपये झाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com