शिवाजी पार्क रणांगण! मुंबईसाठी ठाकरे बंधू विरुद्ध शिंदे–फडणवीस, 'या' तारखेवर शिक्कामोर्तब
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. सर्वच शहरांमध्ये प्रचारसभा, रॅली आणि नेत्यांच्या दौऱ्यांचा जोर वाढला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले असून जोरदार प्रचार करत आहेत. मात्र ठाकरे बंधू अजून प्रत्यक्ष सभांमध्ये दिसले नसल्याने त्यांची पहिली जाहीर सभा कधी होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
आता ही उत्सुकता संपणार असून शिवाजी पार्कवरील सभांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा 11 जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली आहे. सायंकाळी सहा वाजता ही सभा पार पडणार आहे.
तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी भाजप आणि शिंदे गटाची भव्य संयुक्त सभा शिवाजी पार्कवर होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघेही उपस्थित राहणार आहेत.एकाच मैदानावर सलग दोन दिवस मोठ्या राजकीय सभांमुळे मुंबईतील राजकारण अधिक रंगतदार होणार आहे.

