Mumbai Car Accident : Google Mapने दाखवला चुकीचा रस्ता, बेलापूरमध्ये कार थेट खाडीत आणि...

Mumbai Car Accident : Google Mapने दाखवला चुकीचा रस्ता, बेलापूरमध्ये कार थेट खाडीत आणि...

तांत्रिक साधनांवर अवलंबून राहण्याचा धोका: बेलापूरमध्ये कार खाडीत, पोलिसांच्या तत्परतेमुळे महिला सुरक्षित
Published by :
Shamal Sawant
Published on

गुगल मॅपवर दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे नवी मुंबईतील बेलापूर येथे एक चकित करणारी घटना घडली. रात्री उशिरा एका महिलेची ऑडी कार थेट खाडीत कोसळली. मात्र, सुदैवाने सागरी पोलिस आणि रेस्क्यू टीमच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचवण्यात यश आलं. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महिला उलवेच्या दिशेने प्रवास करत असताना गुगल मॅपच्या मार्गदर्शनावर पूर्णपणे अवलंबून होती. मॅपने दाखवलेल्या चुकीच्या मार्गामुळे कार थेट खाडीत शिरली.

घटना कशी घडली?

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजून 18 मिनिटांनी घडली. संबंधित महिला आपल्या ऑडी कारमधून उलवेच्या दिशेने जात होती. गुगल मॅपवर दाखवलेल्या मार्गानुसार ती बेलापूर जेटीजवळील खाडी पुलाजवळ पोहोचली. मात्र मॅपने दाखवलेला रस्ता हा नेमका खाडीच्या पाण्याच्या दिशेने होता आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे ती थेट गाडी चालवत खाडीमध्ये शिरली.

पोलीस आणि रेस्क्यू टीमचा वेळीच हस्तक्षेप

या घटनेची माहिती मिळताच बेलापूर येथे तैनात असलेले पोलीस अधिकारी PSI अलंकार म्हात्रे यांच्या सतर्कतेमुळे तातडीने रेस्क्यू टीमला संपर्क केला गेला. टीममधील बचावकर्ता संस्कार नागती यांनी काही सेकंदांच्या आत पाण्यात उडी घेतली आणि गाडीतून पाण्यावर आलेल्या महिलेला किनाऱ्यावर सुरक्षितपणे पोहोचवलं. रेस्क्यू टीमचे सदस्य म्हणाले की, “गुगल मॅपवर दाखवलेल्या दिशेमुळे ही महिला चुकीच्या रस्त्यावर गेली आणि गाडी थेट पाण्यात गेली. मात्र आमच्या प्रशिक्षणामुळे आणि वेळेवर प्रतिसाद दिल्यामुळे तिचा जीव वाचवण्यात यश आलं.”

पुढील काळजी आणि नागरिकांसाठी इशारा

ही घटना एक इशारा म्हणून पाहिला जात आहे. केवळ तांत्रिक साधनांवर अवलंबून न राहता वाहनचालकांनी रस्त्याची वस्तुस्थिती आणि आजूबाजूचा परिसर तपासूनच वाहन चालवावे, असा सल्ला स्थानिक प्रशासनाने दिला आहे. स्थानिक रहिवासी आणि नागरिकांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “गुगल मॅप हे एक साधन आहे, पण त्यावर संपूर्णपणे अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. वाहनचालकांनी सतर्कता ठेवणे ही काळाची गरज आहे.” या घटनेत महिलेचा जीव वाचला ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. मात्र यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वाहनचालकांनी गुगल मॅपचा वापर करताना विवेक बाळगावा, अशा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत. नवी मुंबईतील बेलापूर खाडी परिसरात सतत गस्त घालणाऱ्या सागरी पोलिसांच्या आणि तत्पर रेस्क्यू टीमच्या कर्तव्यपरायणतेमुळे मोठा अनर्थ टळला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com