Mumbai Air Pollution : मुंबईत थंडीची चाहूल परंतु हवेची गुणवत्ता खालावली...
थोडक्यात
मुंबईत थंडीची चाहूल परंतु हवेची गुणवत्ता खालावली...
मुंबई शहर जगातील नववे सर्वात प्रदूषित शहर
वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम
मुंबई शहरात पावसाळा संपून आता थंडीची चाहूल लागली आहे. पहाटेच्या वेळी मुंबईत गुलाबी थंडी पडलेली असताना आता मुंबईकरांना वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई शहराच्या हवेच्या गुणवत्तेत (AQI) मोठी घट नोंदवली गेली आहे. आज सकाळी शहराच्या अनेक भागांत दाट धुकं पसरल्याने दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे संपूर्ण शहरात धुरकट वातावरण पाहायला मिळत आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, मुंबईचा एकूण एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १०६ ते १६० दरम्यान नोंदवला गेला आहे. जो मध्यम (Moderate) श्रेणीत येतो. तर शनिवारी हा AQI १०४ नोंदवला गेला होता. तसेच एका एजन्सीच्या अहवालानुसार, शनिवारी मुंबईचा AQI १४२ होता. ज्यामुळे मुंबई शहर जगातील नववे सर्वात प्रदूषित शहर ठरले होते.
वाऱ्याचा वेग मंदावला
गेल्या काही दिवसांत पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा झाली होती. ऑक्टोबर महिन्यातील बहुतांश दिवस मुंबईतील हवा चांगल्या श्रेणीत नोंदली गेली होती. मात्र आता थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग मंदावला आहे. यामुळे हवेतील प्रदूषकांचे प्रमाण वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते, थंडी जशी वाढेल, तसा हवेतील प्रदूषणाचा स्तरही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईच्या अनेक भागांतील हवा मध्यम (Moderate) वरून वाईट (Poor) श्रेणीत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे परिणाम
श्वासासंबंधी समस्या: दमा असलेल्या रुग्णांना त्रास वाढणे, खोकला, घसा खवखवणे आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होणे.
हृदयाचे आजार: रक्तवाहिन्यांवर ताण येणे, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
ऍलर्जी/जळजळ: डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे आणि शिंका येणे.
सर्वाधिक धोका: लहान मुले, वृद्ध, दमा आणि हृदयविकार असलेले रुग्ण.
काय उपाय कराल?
मास्क वापरा: बाहेर पडताना N95/KN95 मास्क वापरा.
वेळ टाळा: सकाळी लवकर (पहाटे) आणि संध्याकाळी बाहेर जाणे टाळा, जेव्हा प्रदूषण जास्त असते.
घरातील हवा: खिडक्या बंद ठेवा आणि शक्य असल्यास एअर प्युरिफायर वापरा.
पाणी प्या: शरीराला हायड्रेटेड (तजेलदार) ठेवा.
व्यायाम करणे टाळा: जास्त प्रदूषण असताना जड शारीरिक व्यायाम करणे टाळा.
