Mumbai Local Train Megablock : हार्बर मार्गावरील सेवा 14 तास बंद, प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था
थोडक्यात
मुंबईच्या लाइफलाईन असलेल्या लोकसेवाचा मेगाब्लॉक आहे.
हार्बर मार्गावरील कुर्ला आणि टिळक नगर दरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेसाठी मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे.
हा ब्लॉक रविवार, 14 सप्टेंबर 2025 दुपारी 1.35 वाजेपर्यंत सुरू राहील
Mumbai Local Train Megablock : मुंबईकरांची रोजची वाहतूक आणि लाइफलाईन असलेल्या मुंबई लोकल सेवा आज मेगाब्लॉकमुळे प्रभावित होणार आहे. हार्बर मार्गावरील कुर्ला आणि टिळक नगर दरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी 13 सप्टेंबर 2025 रात्री 11.05 वाजल्यापासून विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आले आहेत. हा ब्लॉक रविवार, 14 सप्टेंबर 2025 दुपारी 1.35 वाजेपर्यंत सुरू राहील, यामुळे जवळपास 14 तास लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.
लोकल सेवांवर प्रभाव
या मेगाब्लॉकमुळे मुंबईतील हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर मोठा परिणाम होईल. 13 सप्टेंबर रात्री 10.20 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होणाऱ्या सर्व डाउन हार्बर लोकल सेवा रद्द करण्यात आले आहेत. याचप्रमाणे, पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे 10.07 वाजेपासून सुटणाऱ्या अप हार्बर सेवा देखील रद्द झाल्या आहेत. या ब्लॉकमुळे लोकल सेवा दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहतील, त्यामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
पर्यायी व्यवस्था
रेल्वे प्रशासनाने हार्बर मार्गावरील प्रवाशांना होणारी असुविधा कमी करण्यासाठी काही पर्यायी व्यवस्था तयार केली आहे. ब्लॉकच्या दरम्यान पनवेल आणि मानखुर्द दरम्यान विशेष लोकल सेवा सुरू केली जातील. याशिवाय, बेस्ट बस आणि एनएमएमटी बस सेवांना अतिरिक्त बस सेवा पुरवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. प्रवाशांना योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून रेल्वे स्थानकांवर पोलिस आणि तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पासधारकांना मेन लाईनवरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे.
ब्लॉक संपण्याची वेळ
हा ब्लॉक दुपारी 1 वाजता संपेल, आणि त्यानंतर पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहिली लोकल दुपारी 1.09 वाजता सुटेल. त्याचप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलसाठी पहिली लोकल दुपारी 1.30 वाजता सुटेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने या कामाची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.