Mumbai Local : मुंबई–महाराष्ट्र रेल्वे नेटवर्कला नवे बळ; कनेक्टिव्हिटी, लोकल आणि स्टेशन विकासावर मोठा भर

Mumbai Local : मुंबई–महाराष्ट्र रेल्वे नेटवर्कला नवे बळ; कनेक्टिव्हिटी, लोकल आणि स्टेशन विकासावर मोठा भर

भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, याचा थेट फायदा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारतीय रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या असून, याचा थेट फायदा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. ईस्ट–वेस्ट कनेक्टिव्हिटी स्पेशल कॉरिडॉर अंतर्गत रेल्वे मार्ग अधिक सक्षम करण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे देशातील मालवाहतुकीत मोठी वाढ करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे. औद्योगिक व व्यापारी दृष्टीने हा कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या नव्या कॉरिडॉरमुळे बंदरे, औद्योगिक क्लस्टर आणि प्रमुख लॉजिस्टिक हब एकमेकांशी थेट जोडले जाणार आहेत. परिणामी, मालवाहतुकीचा वेळ कमी होऊन खर्चात बचत होणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना गती मिळणार असून रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळेल.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे २०२९ पर्यंत २३८ एसी लोकल ट्रेन सेवेत दाखल होणार आहेत. वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची संख्या लक्षात घेता, ही घोषणा अत्यंत महत्त्वाची आहे. एसी लोकलमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि हवेशीर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. सध्या सुरू असलेल्या लोकल सेवांवरील ताण कमी करण्यासाठी हा मोठा टप्पा ठरणार आहे.

याशिवाय, जून महिन्यापर्यंत १५ डब्यांच्या लोकल ट्रेन धावण्यासाठी फलाटांची तयारी पूर्ण केली जाणार आहे. सध्या अनेक स्थानकांवर फलाटांची लांबी अपुरी असल्याने प्रवाशांना अडचणी येतात. नव्या फलाटांमुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित होण्यास मदत होईल आणि लोकल सेवा अधिक सुरळीतपणे चालवता येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, येत्या मार्च महिन्यापर्यंत दोन ‘सेफ्टी डोअर’ असलेल्या लोकल ट्रेन ट्रायल बेसिसवर धावणार आहेत. या सेफ्टी डोअरमुळे लोकलमधून पडण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होईल, असा रेल्वे प्रशासनाचा दावा आहे. ट्रायल यशस्वी ठरल्यास भविष्यात अशा लोकल ट्रेनची संख्या वाढवली जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राच्या रेल्वे पायाभूत सुविधांचा चेहरा बदलणाऱ्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत राज्यातील १३२ स्टेशनचे पुनर्विकास करण्यात येणार आहे. या स्टेशनवर आधुनिक सुविधा, स्वच्छता, डिजिटल माहिती प्रणाली, लिफ्ट, एस्कलेटर, पार्किंग आणि प्रवाशांसाठी सुधारित सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दरम्यान, कोकण रेल्वेच्या मार्गिकेच्या दुहेरीकरणाचे काम प्रगतीपथावर असून, अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर कोकण रेल्वेची संपूर्ण मार्गिका दुहेरी करण्यात येणार आहे. यामुळे कोकण मार्गावरील गाड्यांची संख्या वाढेल, वेळेत सुधारणा होईल आणि पर्यटनालाही मोठी चालना मिळेल. एकूणच, रेल्वेच्या या महत्त्वाकांक्षी योजनांमुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि सोयीस्कर होणार असून, राज्याच्या आर्थिक विकासालाही नवे बळ मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com