Board Exam : दहावी–बारावी परीक्षांसाठी मुंबई पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

Board Exam : दहावी–बारावी परीक्षांसाठी मुंबई पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरण मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना सुरक्षित, शिस्तबद्ध आणि पारदर्शक वातावरण मिळावे यासाठी मुंबई महापालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाने विशेष समितीची स्थापना केली आहे.

दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक मानल्या जातात. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, तसेच कॉपीसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी १३ सदस्यांची विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीमध्ये उपशिक्षणाधिकारी, दोन अभियंते, शाळा प्रशासनाशी संबंधित अधिकारी, सुरक्षा विभागाचे प्रतिनिधी तसेच ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्रे आहेत त्या शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.

ही समिती परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया, तांत्रिक बाबी, कॅमेऱ्यांची संख्या, त्यांची योग्य ठिकाणी बसवणूक, देखरेख आणि देखभाल याबाबत सविस्तर आराखडा तयार करणार आहे. तसेच, सीसीटीव्हीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गोपनीयतेला धक्का बसणार नाही, याचीही विशेष काळजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पालिकेच्या शाळांमधील परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे परीक्षा प्रक्रियेत शिस्त येईल, गैरप्रकारांना आळा बसेल आणि विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. याशिवाय, परीक्षा काळात कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची तत्काळ दखल घेणे शक्य होणार आहे. हा निर्णय शिक्षण क्षेत्रातील एक सकारात्मक पाऊल मानला जात असून, भविष्यात इतर महापालिका किंवा शिक्षण संस्था देखील अशाच प्रकारचे उपाय अमलात आणण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com