Mumbai Police : 'त्या' गोष्टीनंतर शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेर सुरक्षा वाढवली
मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांना आझाद मैदानावर आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन परतीच्या वाटेवर असताना आंदोलकांनी त्यांना घेराव घातला आणि घोषणाबाजी केली. इतकंच नव्हे तर त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकण्यात आल्या. या घटनेनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून ‘सिल्व्हर ओक’ या शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरही पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
सुप्रिया सुळे यांना आंदोलकांचा घेराव
रविवारी सुप्रिया सुळे आझाद मैदानावर जाऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जरांगे पाटलांना “आरक्षणासाठीचा लढा सुरू ठेवा पण आरोग्याची काळजी घ्या” असं आवाहन केलं. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
मात्र, परतीच्या वेळी परिस्थिती चिघळली. काही आंदोलकांनी त्यांना थांबवत घोषणाबाजी केली. काहींनी मार्ग करून दिला तरी आक्रमक गटाने त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या. या प्रकारामुळे आंदोलनाच्या शांततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पोलिसांचा सतर्कतेचा इशारा
या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी तातडीने सुरक्षा वाढवली आहे. आझाद मैदानात आधीच मोठा पोलिस बंदोबस्त होता. पण अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. तसेच, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानाबाहेरही कडक सुरक्षा लावण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं की, “अनपेक्षित प्रकार टाळण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत.”
आंदोलकांची वाढती गर्दी
आझाद मैदानात आता राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांची गर्दी वाढू लागली आहे. आंदोलनस्थळी दिवसरात्र शेकडो कार्यकर्ते ठाण मांडून बसलेले दिसतात. त्याशिवाय अनेक आंदोलक मुंबईतील इतर ठिकाणी फिरताना दिसून आले. मरीन ड्राईव्ह परिसरात काही आंदोलक समुद्रात उतरले होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना बाहेर काढलं आणि “समुद्रापासून दूर राहा, आपली सुरक्षा महत्त्वाची आहे” असं आवाहन केलं.