Mumbai Pune Expressway : शिवजयंती सुट्टीत ‘मुंबई-पुणे’ एक्सप्रेसवे ठप्प; खंडाळा बोगद्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी

Mumbai Pune Expressway : शिवजयंती सुट्टीत ‘मुंबई-पुणे’ एक्सप्रेसवे ठप्प; खंडाळा बोगद्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे मार्गावर आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांना तासन्‌तास अडकून राहावे लागत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई-पुणे मार्गावर आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून प्रवाशांना तासन्‌तास अडकून राहावे लागत आहे. Mumbai Pune Expressway वर खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दोन्ही दिशेने वाहने अत्यंत संथ गतीने पुढे सरकत असल्याने प्रवाशांचा मोठा मनस्ताप होत आहे. शिवजयंतीनिमित्त आज गुरुवारी अनेकांना सुट्टी असल्याने तसेच उद्याचा शुक्रवार आणि त्यानंतर शनिवार-रविवारचा विकेंड असल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. परिणामी लोणावळा-खंडाळा घाट परिसरात वाहतूक प्रचंड वाढली आहे. विशेषतः बोगद्याजवळ कोंडी झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

सोशल मीडियावर या कोंडीचे व्हिडिओ व्हायरल होत असून, मुंबईच्या दिशेने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून काही प्रवासी आपल्या वाहनांमधून उतरून रस्त्यावर उभे असल्याचेही दिसून येत आहे. उन्हाचा त्रास, वेळेचा अपव्यय आणि इंधनाची नासाडी यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यापूर्वी आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपीलीन वायू वाहून नेणारा टँकर उलटल्याने तब्बल ३२ तास वाहतूक ठप्प झाली होती. त्या घटनेनंतर लगेचच पुन्हा झालेली ही दुसरी मोठी कोंडी असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) ने भविष्यात अशा परिस्थितीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विशेष आपत्कालीन वाहतूक व्यवस्थापन योजना तयार करण्याची घोषणा केली आहे. अपघातप्रवण खंडाळा-लोणावळा घाट मार्गाला पर्याय म्हणून उभारण्यात येत असलेला १३.३ किमी लांबीचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

कुसगाव ते खोपोलीदरम्यान दोन बोगदे आणि केबल-स्टेड पूल असलेल्या या मार्गामुळे मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर घाट परिसरातील वळणदार आणि धोकादायक रस्त्यांवरील ताण कमी होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या मात्र प्रवाशांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक पोलिस आणि संबंधित यंत्रणा परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विकेंडच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसही वाहनांची गर्दी कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com