Mumbai Water Shortage
Mumbai Water ShortageMumbai Water Shortage

Mumbai Water Shortage : 22 ते 26 डिसेंबर दरम्यान 87 तास मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबईतील दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. शहरातील काही प्रमुख विभागांत पुढील चार दिवस 87 तास पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
Published by :
Riddhi Vanne
Published on

Mumbai Water Shortage: मुंबईतील दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारी बातमी समोर आली आहे. शहरातील काही प्रमुख विभागांत पुढील चार दिवस 87 तास पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. दादर, अंधेरी पूर्व आणि सांताक्रूझ पूर्व परिसरात मोठ्या जलवाहिनीच्या तांत्रिक कामामुळे 22 डिसेंबरपासून 26 डिसेंबरपर्यंत पाणी कमी दाबाने मिळणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

महापालिकेनुसार, 24000 मिमी व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीच्या जोडणीचे काम या कालावधीत करण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या मेट्रो लाईन–7 अ प्रकल्पासाठी जलवाहिनीचा काही भाग वळवण्यात आला असून, त्या वळवलेल्या भागाची छेद जोडणी करणे अत्यावश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम 22 डिसेंबर सकाळी 10 वाजता सुरू होऊन 26 डिसेंबर मध्यरात्रीनंतर 1 वाजेपर्यंत चालणार आहे.

कुठे आणि कधी पाणी कमी मिळणार?

या कामाचा परिणाम दादर, अंधेरी पूर्व आणि सांताक्रूझ पूर्व भागांतील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. काही परिसरांत ठराविक वेळेत पाणी कमी दाबाने मिळेल, तर काही ठिकाणी नियमित वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

दादर (धारावी परिसर):

धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० व ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा आणि महात्मा गांधी मार्ग येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत पाणी कमी दाबाने येईल.

तर धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक आणि ए. के. जी. नगर येथे सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

अंधेरी पूर्व:

कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी आणि पी अ‍ॅन्ड टी वसाहत येथे दुपारी २ ते सायंकाळी ५.३० कमी दाबाने पाणी मिळेल.

कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रोड) आणि मोगरापाडा येथे सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत पाणीपुरवठा कमी राहील.

सांताक्रूझ पूर्व व वांद्रे पूर्व:

बीकेसीतील मोतिलाल नगर भागात रात्री १० ते ११.४० या वेळेत पाणी कमी दाबाने मिळेल.

प्रभात वसाहत, टीपीएस–३, कलिना, विद्यापीठ परिसर, यशवंत नगर, सुंदर नगर, कोलिवरी गाव, तीन बंगला, शांतिलाल व पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार सब–वे ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग आणि शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) येथे मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी कमी दाबाने दिले जाणार आहे.

महापालिकेचं आवाहन

महापालिकेने नागरिकांना आगाऊ पाण्याचा साठा करून पाणी काटकसरीने वापरण्याचं आवाहन केलं आहे. ही गैरसोय तात्पुरती असली, तरी भविष्यातील महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पासाठी हे काम आवश्यक असल्याचं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

पुढील चार दिवस मुंबईकरांना पाण्याबाबत अधिक काळजी घ्यावी लागणार असून, नियोजन करूनच दैनंदिन कामकाज करण्याची गरज भासणार आहे.

थोडक्यात

  1. मुंबईतील दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणारी बातमी

  2. शहरातील काही प्रमुख भागांत 87 तास पाणीपुरवठा विस्कळीत

  3. पुढील चार दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम

  4. दादर परिसरात पाणी कमी दाबाने मिळणार

  5. अंधेरी पूर्व भागातही पाणीपुरवठा कमी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com