Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' तारखेला 300 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना होणार मोठा त्रास
Western Railway : डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस सलग सुट्ट्या असल्याने अनेक जण फिरायला जाण्याची योजना आखत आहेत. मात्र 26 आणि 27 डिसेंबरला लोकलने प्रवास करायचा असेल, तर ही माहिती आधी जाणून घ्या. पश्चिम रेल्वेवर सुरू असलेल्या नव्या रेल्वेमार्गाच्या कामामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
कांदिवली ते बोरिवली दरम्यान सहाव्या मार्गाचे काम सुरू असल्याने 27 डिसेंबर रोजी पश्चिम रेल्वेच्या सुमारे 300 लोकल गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होणार आहे. याशिवाय पनवेल परिसरातही 30 डिसेंबरपर्यंत रेल्वे ब्लॉक असणार आहे.
वांद्रे टर्मिनस ते बोरिवली या मार्गावर सहाव्या ट्रॅकचे काम शेवटच्या टप्प्यात असून कांदिवली-बोरिवली दरम्यान महत्त्वाची पायाभूत कामे सुरू आहेत. यासाठी 20 डिसेंबरपासून सुमारे एक महिन्याचा वाहतूक ब्लॉक घेण्यात आला असून तो 18 जानेवारी 2026 पर्यंत राहणार आहे. या काळात 26 डिसेंबर रात्री 11 ते 27 डिसेंबर सकाळी 7 वाजेपर्यंत बोरिवली स्थानकात तांत्रिक कामासाठी मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे.
याचदरम्यान 26 डिसेंबर रात्री 11 पासून 27 डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत कांदिवली ते दहिसर दरम्यान जलद मार्गावर गाड्यांच्या वेगावर मर्यादा राहील. या सर्व कारणांमुळे काही लोकल सेवा रद्द होतील, तर काही गाड्या बोरिवली आणि अंधेरीऐवजी गोरेगावपर्यंतच धावतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
थोडक्यात
डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस सलग सुट्ट्या असल्यामुळे प्रवासासाठी गर्दी अपेक्षित आहे.
26 आणि 27 डिसेंबरला लोकलने प्रवास करणार्यांसाठी महत्त्वाची माहिती.
पश्चिम रेल्वेवर नवीन रेल्वे मार्गाच्या कामामुळे काही लोकल सेवा रद्द होणार आहेत.
या कामांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.
प्रवासापूर्वी वेळापत्रक तपासणे आणि पर्यायी योजना तयार ठेवणे गरजेचे आहे.

