धक्कादायक! मुंबईत वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातातच पुन्हा एकदा मुंबईतून काळजाचा थरकाप उडवणारी एक बातमी समोर आली आहे. मुंबईत वरळी सी फेसवर एका गोणीत तरुणीचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या तरुणीची नेमकी ओळख पटलेली नाही. पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वरळी सी लिंकवर स्थानिक नागरिकांना एका गोणी तरंगतांना आढळली. त्यांना ती संशयास्पद आढळल्याने याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी ती गोणी उघडून पाहिली असता त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीचे हात आणि पाय तुटले होते. दरम्यान, या तरुणीची हत्या करण्यात आली असून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने तिचा मृतदेह गोणीत टाकून समुद्रात फेकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
दरम्यान, या तरुणीची ओळख पटलेली नाही. या तरुणीचे अंदाजे वय हे २० ते ३० दरम्यान आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.