Nana Patole : महानगरपालिका प्रचार रणधुमाळीत; भाजपवर नाना पटोलेंचा जोरदार हल्लाबोल

Nana Patole : महानगरपालिका प्रचार रणधुमाळीत; भाजपवर नाना पटोलेंचा जोरदार हल्लाबोल

राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांसाठी सुरू असलेल्या प्रचारात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राज्यात सध्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. मुंबईसह राज्यातील विविध महानगरपालिकांसाठी सुरू असलेल्या प्रचारात सर्वच प्रमुख पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे जोरदार प्रचार दौरे करत असून, पायाला भिंगरी लावल्यासारखी त्यांची धावपळ सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मनसे आणि इतर पक्षांचे नेतेही प्रचारात व्यस्त आहेत. या निवडणूक रणधुमाळीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. भाजप लोकांची मतं मिळवण्यासाठी हिंदू, मुस्लिम, मराठी, हिंदी अशा मुद्द्यांवर राजकारण करत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

“भाजपवाले मानसिक आजारी” – नाना पटोले

भाजपवर सडकून टीका करताना नाना पटोले म्हणाले, “भाजपवाले मानसिक आजारी आहेत. त्यांना सत्तेचा माज आला आहे. लोकांच्या मनात भाजपविरोधात प्रचंड रोष आहे आणि तो लवकरच उफाळून येईल.” लोकांची मतं मिळवण्यासाठी धार्मिक आणि भाषिक विषयांचा वापर केला जात असल्याने त्याचे दुष्परिणाम सामान्य जनतेला, विशेषतः शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

“जनता वाऱ्यावर, म्हणून शेतकरी आत्महत्या”

निवडणूक आयोग आणि सरकारच्या भूमिकेवरही पटोलेंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत. सरकार निवडणूक प्रचारात व्यस्त आहे, पण जनता वाऱ्यावर सोडली आहे. त्यामुळेच राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे,” असा आरोप त्यांनी केला. नेते हेलिकॉप्टरने फिरत असताना शेतकरी मात्र संकटात सापडला असल्याची टीकाही त्यांनी केली.

यावेळी अजित पवारांच्या निवेदनाचा संदर्भ देत पटोले म्हणाले, “७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केला तरी मी मोकळा आहे, हे अजित पवारांचं वक्तव्य अनेक संकेत देणारं आहे.”

राहुल नार्वेकरांवर कारवाईची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप समोर आल्यानंतर पटोलेंनी यावरही भाष्य केलं. “विधिमंडळाची एक परंपरा आहे. अध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही न्याय दिला पाहिजे. मात्र नार्वेकर राजकीय भूमिकेत वागत असल्याने भाजपने त्यांना पदावरून हटवावं,” अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, नारायण राणे यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिल्याबाबत बोलताना पटोले म्हणाले की, “ज्येष्ठ नेत्यांनी राणेंचा आदर्श घ्यावा,” असे सूचक विधान त्यांनी केले. या वक्तव्यांमुळे निवडणूक प्रचाराच्या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com