Mohan Bhagwat : “हिंदुस्थानात राहणारे मुस्लिमही हिंदूच”; सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान

Mohan Bhagwat : “हिंदुस्थानात राहणारे मुस्लिमही हिंदूच”; सरसंघचालक मोहन भागवतांचे विधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्म, लोकसंख्या आणि सामाजिक एकात्मतेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदू धर्म, लोकसंख्या आणि सामाजिक एकात्मतेबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. “हिंदुस्थानात राहणारे मुस्लिमदेखील हिंदूच आहेत. ते काही अरब देशांतून आलेले नाहीत. त्यांची घरवापसी करायची आहे,” असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भागवत यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कृतीचा इतिहास अधोरेखित करताना सांगितले की, हिंदुस्थानवर ५०० वर्षे मुघल आणि २०० वर्षे इंग्रजांनी राज्य केले. मात्र या दीर्घ काळातही हिंदू धर्म आणि संस्कृती संपवता आली नाही. “हिंदू धर्माचा पाया अत्यंत भक्कम आहे. त्यामुळे आता कोण काय बिघडवणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी ‘घरवापसी’ या संकल्पनेचा उल्लेख करताना सांगितले की, भारतातील सर्व समाजघटकांची मूळ सांस्कृतिक परंपरा एकच आहे. त्यामुळे समाजात फूट पाडण्याऐवजी एकात्मतेवर भर देण्याची गरज आहे. त्यांच्या या वक्तव्याचा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला जात आहे.

लोकसंख्या विषयावर भाष्य करताना भागवत म्हणाले की, सध्या देशातील लोकसंख्या वाढ दर २.१ इतका आहे. तो किमान ३ असावा. “प्रत्येक हिंदू दांपत्याने किमान तीन अपत्ये जन्माला घालावीत,” असे आवाहन त्यांनी केले. लग्नबंधनात अडकणाऱ्या युवक-युवतींना किमान तीन मुले होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी नमूद केले.

या विधानावरून राजकीय पातळीवर प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. काहीजणांनी हे विधान सांस्कृतिक एकात्मतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे म्हटले, तर काहींनी लोकसंख्या वाढीच्या आवाहनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

दरम्यान, संघाच्या विचारसरणीप्रमाणे भारताची ओळख सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारित असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले. भारतात विविध धर्म, भाषा आणि परंपरा असल्या तरी त्यामागील सांस्कृतिक मूळ एकच असल्याचा दावा त्यांनी केला. भागवत यांच्या या भाषणामुळे आगामी काळात सामाजिक आणि राजकीय चर्चांना वेग येण्याची चिन्हे आहेत. त्यांच्या विधानाचे परिणाम आणि त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com