Me Too प्रकरणात नाना पटेकरांना दिलासा, अंधेरी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
अभिनेते नाना पाटेकर यांना 'मी टू' प्रकरणी दिलासा मिळाला आहे. बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने नाना पाटेकरांवर लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. मात्र त्यांच्या विरोधातील तक्रार दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळली आहे. तनुश्रीने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये लैंगिक आरोप सिद्ध करणारे पुरावे नसल्याचे समोर आले आहे.
तनुश्री दत्ताने 2008 साली नाना पटेकर, नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दिकी आणि निर्माता राकेश सारंग यांनी विरोधात लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी ऑक्टोबर 2018 मध्ये ओशिवरा पोलिस स्थानकात चौघांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय?
2008 साली 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकरांनी तनुश्री दत्ताचा छळ केला असा आरोप करण्यात आला होता. त्याचप्रमाणे तनुश्रीने या तक्रारीमध्ये णेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दिकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधातही तक्रार दाखल केली होती. मात्र या प्रकरणी चौकशी केल्यानंतर कोणताही पुरावा नसल्याचा अहवाल पोलिसांनी दिला. त्यानंतर पुन्हा एकदा तनुश्रीने डिसेंबर 2019 साली याचिका दाखल केली यामध्ये पुन्हा एकदा तपास व्हावा अशी विनंती केली. मात्र आता न्यायालयाने नाना पाटेकरांना मोठा दिलासा दिला आहे.