Nana Patole : "आपण पुन्हा सरकार बनवू, तुम्ही काँग्रेसकडे या"; नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जनतेला होळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये राजकीय चिखल झाला आहे. त्यामुळे त्याला होळी हा शब्द वापरता येणार नाही. अनेक रंग मिळून हा सण आपण साजरा करतो तसंच माणसाच्या जीवनातील वैरत्व , स्वार्थ, लोभ बाजूला सारून सर्वांना एकत्रित येण्याचा संदेश , ममता बंधुत्व कायम ठेवण्याचा संदेश हा सण आपल्याला देतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, "भाजपबरोबर जाऊन दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची फार वाताहात होत आहे. त्यामुळे माझा त्यांना सल्ला असा असले की, आपण पुन्हा सरकार बनवू. काँग्रेसकडे या तुम्ही. अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदाची आस लागली आहे. परवा अजित दादा एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यांना पहिल्या नंबरच्या खुर्चीवर जाण्याचं वेध लागलं आहे."
"एकनाथ शिंदे यांना वाटते की माझ्यामुळे सरकार आले, मला दुसऱ्या नंबरच्या खुर्चीवर टाकण्यात आलं. त्या दोघांच्या खुर्चीची हौस आम्ही पूर्ण करुन टाकू. दररोज त्यांचा अपमान होत आहे. अजितदादांना बिना पैशाचं बजेट मांडावा लागलं. त्यांना होणारा त्रास पाहता आम्ही त्यांना न्याय देऊ. बुरा ना मानो होली है" असे नाना पटोले म्हणाले.