समीर वानखेडे भाजपाची पोलखोल करू शकतात - नाना पटोले
कॉर्डिलिया क्रूझवरील ड्रग्स प्रकरणी छापेमारीवेळी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक न करण्यासाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा समीर वानखेडेंवर आरोप आहे. यावरुन वानखेडेंची तब्बल साडेसहा तास सीबीआय चौकशी झाली. तर, आता याप्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच सीबीआयसी (CBIC)कडूनही चौकशी सुरू झाली आहे. यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
एनसीबीच्या एसआयटीने तयार केलेला अहवाल सीबीआयसी विभागाकडेही देण्यात आला आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याच अहवालाच्या आधारे त्यांची विभागीय चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चौकशीनंतर वानखेडे यांच्यावर लवकरच कारवाई होण्याची शक्यता असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील होऊ शकते.
यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, मोहन भागवतांना भेटल्यानंतर चौकशीचा ससेमिरा मागे का लागला. यामध्ये काही ना काही गोष्टी समोर येतील. यामध्ये काही ना काही लपलेलं आहे. समीर वानखेडे हे संघाच्या मुख्यालयात जाऊन संघप्रमुखांना भेटून आले. त्यानंतर त्यांच्या मागे चौकशीचा ससेमेरा लागला. यामध्ये काहीतरी दाल में काला है! वानखेडेंजवळ भाजप आणि संघाची पोलखोल करू शकतो अशा काही वस्तू आहेत. असे नाना पटोले म्हणाले.