Nana Patole : महायुती सरकार बरखास्त करण्याची नाना पटोलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

Nana Patole : महायुती सरकार बरखास्त करण्याची नाना पटोलेंची राष्ट्रपतींकडे मागणी

महायुती सरकार: नाना पटोलेंची राष्ट्रपतींकडे निवेदन, महाराष्ट्र निवडणुकीतील अनियमिततेची सखोल चौकशीची मागणी.
Published by :
Team Lokshahi
Published on

कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते नाना पटोले यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन दिले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या संभाव्य गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. तसेच सध्याचे राज्य सरकार तत्काळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. या निवेदनात नाना पटोले यांनी नमूद केले आहे की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांनी नुकतेच 82 विधानसभा मतदारसंघांतील 12, 000 पेक्षा अधिक मतदान केंद्रांवर गंभीर प्रक्रियात्मक अनियमितता झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या गडबडीमुळे कोट्यवधी मतांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, हे प्रकरण केवळ प्रशासकीय त्रुटी नसून संविधानाच्या मूलभूत मूल्यांवर घाला आहे.

त्यांची पहिली मागणी अशी आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय न्यायिक किंवा विशेष तपास समिती स्थापन करावी. दुसऱ्या मागणीत त्यांनी या चौकशीचा अहवाल येईपर्यंत सध्याचे राज्य सरकार तत्काळ बरखास्त करून, राज्यात पुन्हा एकदा निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करावी असा उल्लेख केला आहे.

पटोले यांनी राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करताना सांगितले की, “लोकशाहीचा गाभा असलेली निवडणूक प्रक्रिया जर संशयाच्या भोवऱ्यात सापडली, तर सामान्य जनतेचा विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे याप्रकरणी तातडीने आणि निर्णायक पावले उचलणे आवश्यक आहे.”

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com