देवपूजा करता म्हणून नाकारले जात वैधता प्रमाणपत्र
कमलाकर बिरादार , नांदेड
देवपूजा करता म्हणून जातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीस आलीय. त्यामुळे आता आमच्या देव्हाऱ्यासह सगळे देव सरकारच्या हवाली करणार असल्याची भूमिका महादेव कोळी समाजाने घेतलीय. त्यासाठी महादेव कोळी समाज उद्या नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घरातले सगळे देव जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करणार आहेत.
नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील खरटवाडी या गावातून या अनोख्या आंदोलनाला सुरुवात झालीय. गावात राहणाऱ्या मयुरी पुंजरवाड ही तरुणी एमबीबीएस शिकून एमडीच्या अभ्यासक्रमाला आहे. विशेष म्हणजे शासकीय सेवेत असणाऱ्या मयुरीच्या वडिलांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले मात्र मयुरीला महादेव कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास समितीने नकार दिलाय. जात वैधता समितीने दिलेल्या अहवालात तुम्ही हिंदू देव देवतांचे पूजन करता म्हणून तुम्ही महादेव कोळी नाहीत असा अजब निष्कर्ष दिलाय.
देवपूजा करता म्हणून जर आम्हाला जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात येत असेल तर आम्ही या देवाचा त्याग करतो अशी भूमिका या समाजाने घेतलीय. त्यासाठी उद्या नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर महादेव कोळी समाज भव्य मोर्चा काढून घरातल्या देवांच्या मुर्त्या, देव्हारे आणि प्रतिमा प्रशासनाच्या हवाली करणार आहेत. महादेव कोळी समाजाच्या या आक्रमक भूमिकेमुळे सध्या नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.